सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : चार उपकेंद्रांना राष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र

विठलापूर, राजापूर, माधवनगर, जांभुळणी उपकेंद्रांचा समावेश ः शासनाकडून मिळणार निधी

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी करत सांगली जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली छाप राष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे. विठलापूर, राजापूर, माधवनगर आणि जांभुळणी या चार आरोग्य उपकेंद्रांची प्रतिष्ठेच्या ‌‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके‌’ प्रमाणपत्रासाठी निवड झाली आहे. यापूर्वी हरिपूर आणि मालगाव या दोन उपकेंद्रांनाही हे मानांकन मिळाले होते. त्यामुळे एकूण 7 पैकी 6 उपकेंद्रांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत ‌‘राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्रा‌’मार्फत नुकताच हा निकाल जाहीर करण्यात आला. यात तासगाव तालुक्यातील राजापूर उपकेंद्राने 88.97 टक्के गुण मिळवत आघाडी घेतली, तर आटपाडी तालुक्यातील विठलापूर (86.62 टक्के) आणि जांभुळणी (85.06 टक्के) उपकेंद्रांनीही गुण मिळवले. मिरज तालुक्यातील माधवनगर उपकेंद्राने 80 टक्के गुणांसह ‌‘क्वालिटी सर्टिफाईड‌’ मानांकन मिळवले.

गुणवत्ता वाढीसाठी निधीचा लाभ

या मानांकनामुळे संबंधित उपकेंद्रांना सेवांची गुणवत्ता अधिक सुधारण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अधिक सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

सामूहिक प्रयत्नांना यश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. विवेक पाटील यांचे या केंद्रांना मार्गदर्शन लाभले. या मानांकनामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे. जनतेचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. आगामी काळात जिल्ह्यातील आणखी आरोग्य केंद्रांना मानांकन मिळवून देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास डॉ. विजयकुमार वाघ यांनी केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT