सांगली : विश्रामबाग येथील चाणक्यपुरी पार्कजवळील एसटी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका बँक मॅनेजरच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ५ तोळ्यांहून अधिक सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अंकली (ता. मिरज) येथील माजी सरपंच राहुल पाटील याला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला ५ तोळे सोन्याचा ऐवज आणि मोठी रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग येथील 'अरिहंत सदन अपार्टमेंट'मधील फ्लॅट क्रमांक टी-१ मध्ये राहणारे बँक मॅनेजर अश्विन पिल्ले हे १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कौटुंबिक कामासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून आत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबवला होता. २२ ऑगस्ट रोजी दुपारी पिल्ले कुटुंबीय परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुंडाविरोधी पथकाकडून गुन्ह्याचा छडा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुंडाविरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अंकली येथील माजी सरपंच राहुल पाटील याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले ५ तोळे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस म्हणतात... आजारी असल्याने नोटीस देऊन सोडले
दरम्यान, एवढी मोठी घरफोडी करून मुद्देमाल जप्त झाल्यानंतरही माजी सरपंचाला अटक का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर, चोरीचा सर्व मुद्देमाल रिकव्हर (हस्तगत) झाला असून संशयित आजारी असल्याने त्याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.