Sangli Crime News Pudhari
सांगली

Sangli Crime : माजी सभापती संजय जमदाडे यांच्यावर हल्ला

मणेराजुरी येथे पाठलाग करून मारहाण; 10 जणांविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय जालिंदर जमदाडे (वय 49, रा. मणेराजुरी) यांच्यावर मणेराजुरी परिसरात पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोन दुचाकींवरून पाठलाग करत आलेल्या संशयितांनी लोखंडी गज, काठ्या आणि विटांनी केलेल्या या मारहाणीत जमदाडे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जखमी संजय जमदाडे यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.

गुरुप्रसाद ऊर्फ बबलू हणमंत पवार, हणमंत मानसिंग पवार, अविनाश संभाजी पवार, सुजित सुरेश पवार, नितीन ज्ञानदेव पवार, अरुण भीमराव पवार, अरुण तानाजी पवार, प्रवीण बबन पवार, प्रशांत सुभाष पवार आणि अविनाश ऊर्फ कैलास दिलीप पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, 18 मार्चरोजी संशयित आणि फिर्यादी संजय जमदाडे यांच्यात जुन्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून ही घटना घडली. संजय जमदाडे हे त्यांच्या दुचाकीवरून मणेराजुरी स्टँड ते कवठेमहांकाळ रस्त्यावरील पेट्रोल पंपाकडे जात असताना, गुरुप्रसाद पवार व इतर संशयित दोन दुचाकींवरून त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जमदाडे आपले चुलत भाऊ सुनील जमदाडे यांना पाहण्यासाठी सह्याद्री गार्डन हॉटेलमध्ये गेले असता, संशयित गुरुप्रसाद आणि हणमंत पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. ‌‘तू बाहेर ये, तुला आज सोडत नाही‌’, अशी धमकी देत गुरुप्रसादने हॉटेलमधील खुर्ची डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हॉटेलबाहेर आल्यावर लोखंडी गजाने जमदाडे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.

जमदाडे हे हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना संशयित हणमंत पवार याने लोखंडी गजाने त्यांच्या बरगडीवर मारून गंभीर दुखापत केली. यावेळी उपस्थित सर्व 10 संशयितांनी हातात कोयता, रॉड, काठ्या आणि विटा घेऊन ‌‘याला आज संपवून टाका‌’, अशी आरडाओरड करत दहशत निर्माण केली आणि त्यानंतर तेथून पसार झाले. तासगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. माजी सभापतींवरील या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि मणेराजुरी परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT