माजी नगरसेवकपुत्राकडून १.३९ कोटींची फसवणूक File Photo
सांगली

Sangli Crime| माजी नगरसेवकपुत्राकडून १.३९ कोटींची फसवणूक

महापौरांकडे तक्रार : आयुक्तांना दिले चौकशी, फौजदारीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : एका माजी नगरसेवकाच्या मुलाकडून महापालिकेची १.३९ कोटींची फसवणूक झाली आहे. त्याबाबत माझ्याकडे तक्रार आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, शहरातील सर्वपक्षीय कृती समितीतील काहीजण चांगले काम करत आहेत, तर काहीजण महापालिकेला लुटून आता समाजसेवेचा आव आणत आहेत. त्यांच्याबद्दलच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. स्वागत बिल्डर्सतर्फे मंजुषा पाटील यांनी आपल्याकडे कुपवाडमधील डीपी रस्ता व खुल्या जागेच्या कब्जेपट्टीबाबत निवेदन दिले आहेत. यात मूळ मालकाने मंजुषा पाटील यांना नोंदणीकृत वटमुखत्यार पत्र दिले होते. त्याआधारे २००६ मध्ये त्यांच्याकडून कुपवाडमधील स. नं. १८४ मधील २४ मीटर, १८ मीटर व १२ मीटर डीपी रस्त्याची कब्जेपट्टी महापालिकेने घेतली. पण २०११ मध्ये पुन्हा नोटरी वटमुखत्यारपत्र करून नीलेश पवार व सखाराम महाडिक यांनी याच जागेसाठी नुकसानभरपाईसाठी बेकायदेशीररित्या महापालिकेकडे अर्ज केला.

त्यानुसार २०१५ मध्ये महासभेच्या ठरावाने पवार व महाडिक यांना एक कोटी ३९ लाख ३२ हजार ६०० रुपये नुकसानभरपाई व टीडीआर देण्यात आला आहे. त्यांनी महापालिकेची फसवणूक करून ३० मीटर रस्त्यांची नुकसानभरपाई घेतली आहे. त्यासाठी महासभेचा ऐनवेळचा ठराव करून सन २०१९ मध्ये पैसे लाटले आहेत. त्यांच्यावर फौजदारी दाखल करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

कब्जेपट्टी नोंदणीकृत वटमुखत्यारदाराकडून, तर नुकसान भरपाई बोगस नोटरीद्वारे कागदपत्रे तयार करून अन्य लोकांना दिलेली आहे. महासभेचे ऐनवेळचे ठराव आणि महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी दाखल करण्याकामी आदेश व्हावेत. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यावीत, असेही महापौर सूर्यवंशी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

माळबंगला जागेतही घोळ

महापौर सूर्यवंशी म्हणाले, माळबंगला येथील जागेचा विषय मध्यंतरी ऐरणीवर होता. महापालिकेची जागा असतानाही ती १ (ज)चा ठराव करून एका बिल्डरच्या घशात घातली. पुन्हा तीच जागा बिल्डरकडून महापालिकेने विकत घेतली. या प्रकरणात काहीजणांचा समावेश आहे. काँग्रेसच्या काळात महापालिकेत मोठमोठे घोटाळे झाले असून घोटाळेबाजच आता भाजपवर आरोप करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT