Sangli Leopard Attack 
सांगली

Sangli Leopard Attack : शिराळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पारधी सक्तीच्या रजेवर

नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर :बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर हणमंत पाटील या चारवर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शनिवार, दि. 31 रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक सागर गवते यांची बैठक झाली. बैठकीनंतर शिराळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ पारधी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश देण्यात आला असून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्यात येणार आहे. त्यांचा पदभार सांगली मोबाईल स्कॉडचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्याकडे दिल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, बिऊर येथे दुर्दैवी घटना होऊनही अधिकाऱ्यांनी संवेदना दाखवली नाही, ही चिंताजनक बाब आहे. त्यांना ‌‘कारणे दाखवा‌’ नोटीस देऊन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर हणमंत पाटील या बालकावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक झालेल्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटना घडलेल्या ठिकाणासह तडवळे, उपवळे या तीन गावांत 6 पिंजरे लावले आहेत, 3 ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.

घटनास्थळी सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, भिवा कोळेकर, संतोष कदम व इतर वन कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ज्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, त्या परिसराची माहिती घेऊन वन विभागाने 6 ठिकाणी पिंजरे लावले. त्यामध्ये 6 बोकड ठेवण्यात आले आहेत. 3 कॅमरे लावले आहेत. शेतकऱ्यांनी एकटे शेतात जाऊ नये, मुलांना अंगणात व इतरत्र एकटे सोडू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वन विभागासमवेत तडवळे, उपवळे, बिऊर परिसरात शिराळा पोलिसांनीही गस्त घालून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपनिरीक्षक शशिकांत पाटील, हवालदार अरुण मामलेकर, अनुज पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT