सांगली

सांगली: खाद्यपदार्थांचे दर भडकले

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा:  सांगलीसह जिल्ह्याच्या विविध भागात वडापाव, पोहे, शिरा, उप्पीट, राईस प्लेट अशा विविध खाद्यपदार्थ तसेच घरगुती खानावळीतील जेवणाच्या डब्याच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. मात्र काहीजणांनी दरवाढ न करता पदार्थाचा आकार कमी केला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर वाढत्या महागाईमुळे दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे. भारतात होणारी खाद्यतेलाची आवकही या युद्धामुळे कमी झाली आहे. परिणामी खाद्यतेलांच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्याचबरोबर मसाले पदार्थ, गॅस, कांदे, बटाटे, तांदूळ, डाळ अशा अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. हॉटेल, खानावळ चालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. पूर्वीच्या दरात पदार्थाची विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे बहुसंख्य जणांनी खाद्यपदार्थांचे दर वाढविले आहेत.

सांगलीत गेल्या महिन्यात 10 रुपयांना मिळणार्‍या वडापावाची आज काही ठिकाणी 15 ते 25 रुपयांना विक्री होत आहे. भजी प्लेटचे दरही वाढवले आहेत. पोहे, उप्पीट, पुरीभाजी, मिळस, उत्तप्पा यांचे दर 15 ते 20 टक्क्यांनी भडकले आहेत. ढाबे, हॉटेलमध्ये शाकाहारी थाळीचे दरही 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत.

चिकनचा भाव 180 रुपये किलोवरून 300 रुपये झाल्याने चिकन ताटाचा दर भडकला आहे. दर वाढल्याने लोकांमधून तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरवाढीने खवय्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दुसर्‍या बाजूला अगोदर ग्राहकांची संख्या कमी असल्याने त्यात दरवाढ करणे शक्य नसल्याने काही व्यावसायिकांनी पदार्थाचा आकार कमी केला आहे. काही खानावळीमध्ये जुन्याच दराची पाटी लावून नवीन दराने पदार्थाची विक्री होत आहे. त्यामुळे पैसै देण्यावेळी वादाचे प्रसंगही होत आहे.

गावापासून शहरात आलेले विद्यार्थी आणि नोकरदार यांना घरगुती खानावळीचा मोठा आधार असतो. काही दिवसांपूर्वी महिन्याला 2 हजार 200 रुपये असणारा दर आज 2 हजार 600 रुपये झाला आहे. सरासरी 400-450 रुपयांची वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडले आहे.

शिवभोजन केंद्रामध्ये नाष्ट्याची सोय करण्याची नागरिकांची मागणी

राज्यशासनाने गरजू आणि गरिबांना अत्यल्प दरात जेवण मिळावे, या उद्देशाने शिवभोजन थाळी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा जिल्ह्यात हजारो लोकांना फायदा होत आहे. प्रमुख शहरामध्ये असणार्‍या 42 केंद्रांतून दररोज 5225 गरजूं 10 रुपयामध्ये भोजनाचा आस्वाद घेतात. अत्यल्प दरामध्येच याच केंद्रांतून पोहे, उप्पीट अशा नाष्टाची सोयही करण्याची मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT