सांगली : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना गुरुवार, दि. 9 ऑक्टोबररोजी शक्य आहे. तसे संकेत मिळत आहेत. दरम्यान, प्रभागांमधील आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय हालचालींना गती येणार आहे.
महापालिकेच्या 2025 च्या निवडणुकीसाठी 2011 च्या लोकसंख्येनुसार प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली. त्यावर 229 सूचना, हरकती दाखल झाल्या. त्यावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला व तिथून राज्य निवडणूक आयोगाला सादर झाला. राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धीचा कालावधी दि.9 ते 13 ऑक्टोबर 2025 हा आहे. दरम्यान, प्रभाग रचना अंतिम करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकार्यांना दि. 8 रोजी मुंबईला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चेनंतर दि. 9 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होऊ शकते. दि.9 ते 13 या कालावधीत सुटीचा दिवस वगळून केव्हाही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी होऊ शकते, असेही सांगण्यात आले.
प्रभाग रचना अंतिम झाल्यावर प्रभागांतील अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जाती सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच सर्वसाधारण महिला हे आरक्षण निश्चित होईल.
महिला, अनुसूचित जाती जागांचे काय होणार
महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत अनुसूचित जमाती 1 (महिला) आरक्षण प्रभाग क्रमांक 20 मध्ये पडले होते. अनुसूचित जातीच्या 11 जागांचे आरक्षण प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 7, 8, 10, 11, 14, 18, 19 आणि 20 या एकूण 11 प्रभागांमध्ये पडले होते. प्रत्येक प्रभागांमधील अ, ब, क, ड पैकी ‘अ’चे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. यावेळच्या निवडणुकीतही या अकरा प्रभागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण निश्चित होईल, असे सांगितले जात आहे. महिला आरक्षणाचे रोटेशन होणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. एकुणच प्रभागांतील आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.