सांगली : कोयना, वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. धरणांतून होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांवरील महापुराचा धोका तूर्त टळला आहे. यामुळे पूरपट्ट्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी रात्री 10 वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फूट 7 इंच होती. दरम्यान, शुक्रवारी पाणी पातळी ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज सांगली पाटबंधारे विभागातून देण्यात आला.
सांगलीत आयर्विन पुलाजवळ बुधवारी रात्री कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली. पाणी पातळी 40 फूट झाली. कृष्णेचा पूर धोका पातळी गाठण्याची शक्यता होती; मात्र गुरुवारी धरण पाणलोट क्षेत्र, मुक्त पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली. महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे दिवसभरात केवळ 14 ते 17 मि.मी. इतकाच पाऊस झाला. त्यामुळे कोयना व वारणा धरणांत येणार्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणांतून नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात आला.
गुरुवारी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्राकार दरवाजे 11 फुटांवरून 9 फुटांपर्यंत खाली आणून विसर्ग 80 हजार क्युसेकवरून 67 हजार 900 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. दुपारी 3 वाजता दरवाजे 7 फुटापर्यंत खाली आणत विसर्ग 56 हजार 100 क्युसेक करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता दरवाजे 4 फूट 6 इंचापर्यंत खाली आणल्यानंतर विसर्ग 36 हजार 700 क्युसेक झाला. रात्री नऊ वाजता दरवाजे तीन फुटापर्यंत खाली आणून विसर्ग 21 हजार 900 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याचा परिणाम आज, शुक्रवारी सांगलीत दिसून येईल. दरम्यान, चांदोली धरणाचे चारही दरवाजे दिवसभरात टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात आले आहेत. सध्या विद्युतगृहातून केवळ 1630 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
बुधवारी रात्री 10 वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली. पाणी पातळी 40 फूट झाली. मध्यरात्री 12 वाजता ती 40 फूट 6 इंच झाली. गुरुवारी पहाटे चार वाजता 40 फूट 11 इंच, सकाळी 7 वाजता 42 फूट, दुपारी 1 वाजता 43 फूट पाणी पातळी झाली. सांगलीत नदीकाठावरील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रस्ता, पटवर्धन कॉलनी, दत्तनगर, शिवशंभो चौक या परिसरात पुराचे पाणी शिरले. शहरातील तीन रस्ते पाण्याखाली गेले. सांगलीत दुपारनंतर पाणी पातळी अतिशय संथगतीने वाढत होती. गुरुवारी दुपारी एक ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या साडेनऊ तासात पाणी पातळी केवळ सात इंचाने वाढली.
सांगलीतील नदीकाठच्या भागातील 169 कुटुंबातील 830 नागरिकांचे स्थलांतर झाले. त्याचबरोबर ग्रामीण भागात नदीकाठच्या गावांतूनही स्थलांतर झाले. शिराळा तालुक्यातील 88, पलूस तालुक्यातील 757, वाळवा तालुक्यातील 555, मिरज पश्चिम भागातून 83 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यातून एकूण 527 कुटुंबांतील 2 हजार 313 नागरिकांनी स्थलांतर केले. त्यापैकी 586 नागरिक निवारा केंद्रात आहेत. उर्वरित काही पूरग्रस्तांनी नातेवाईकांकडे, तर काहींनी भाड्याच्या इमारतीत स्थलांतर केले आहे. सांगलीत पाणी पातळी 43 फूट 6 इंचावर दोन तास स्थिर होती. शुक्रवारी पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, तसा महापुराचा धोका दूर होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांना दिलासा दिला. प्रशासनास आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
कोयना पूल (कराड), कृष्णा पूल (कराड) येथे बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून पाणी पातळी ओसरू लागली, मात्र बहे पुलावर पाणी ओसरण्यास सुरुवात होण्यास पहाटेचे चार वाजले. ताकारी पुलावर सकाळी परिणाम दिसू लागला. पेठजवळून येणारी तीळगंगा नदी कृष्णा नदीला बहे येथे मिळते. तीळगंगा नदीतून पाणी मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीत मिसळत होते. त्यामुळे बहे पूल येथे पाणी पातळी कमी होण्यास विलंब लागला.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 16.2 मिलिमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.4 (308.4), जत 2.8 (283.3), खानापूर-विटा 2 (253.9), वाळवा-इस्लामपूर 5.8 (445.9), तासगाव 3.4 (309), शिराळा 16.2 (1058.3), आटपाडी 0.9 (286.1), कवठेमहांकाळ 5.2 (296.7), पलूस 4.7 (383.5), कडेगाव 2.1 (309.1).
कृष्णा पूल (कराड) : 28.11
बहे पूल : 17.6
ताकारी पूल : 52.5
भिलवडी पूल : 49.9
आयर्विन पूल : 43.6
राजापूर बंधारा : 48.11