शशिकांत शिंदे
सांगलीः सांगलीतील गुन्हेगारीने आता केवळ कोयते आणि तलवारीपुरती मर्यादित न राहता थेट पिस्तुलापर्यंत मजल मारली आहे. शहरातील गजबजलेल्या राम मंदिर चौकात, पंचमुखी मारुती रस्ता परिसरात मध्यरात्री झालेला गोळीबार हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, तो कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी गोळी आहे.
गेल्या काही काळापासून शहरात नशेखोरी, कोयताहल्ले आणि तलवारीने दहशत माजवण्याचे प्रकार वाढले आहेत. आता गुन्हेगारांच्या हातात सहजपणे उपलब्ध होणारे गावठी कट्टे ही शहरासाठी नवी डोकेदुखी ठरली आहेत. किरकोळ कारणावरून, म्हणजे मुलाच्या वाढदिवसाला न आल्याच्या वादातून जर भरवस्तीत पिस्तूल बाहेर निघत असेल, तर सांगलीची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे? सराईत गुन्हेगार उजळ माथ्याने पिस्तूल कमरेला लावून फिरतात, ही बाब पोलिसांच्या गोपनीय यंत्रणेचे अपयश अधोरेखीत करते. केवळ गुन्हेगारांना पकडून प्रश्न सुटणार नाही. मूळ प्रश्न हा आहे, की हे अवैध कट्टे शहरात येतात कुठून? त्यांचे पुरवठादार कोण आहेत आणि सराईत गुन्हेगारांकडे अशा शस्त्रांसाठी अर्थपुरवठा कोठून होतो? या सर्वांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची गरज आहे. पोलिसांनी जरब पुन्हा निर्माण केली नाही, तर शांततेला ग्रहण लागेल.