सांगली

Sangli Fire Incident : बिळाशी येथे हार्डवेअर दुकानाला आग

शॉर्टसर्किटमुळे घटना; कोट्यवधीचे साहित्य जाळून खाक

पुढारी वृत्तसेवा

कोकरूड : बिळाशी (ता. शिराळा) येथील बसस्थानक परिसरातील हार्डवेअर दुकानाला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल विलास भोगावकर यांचे बसस्थानक परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गावातून जाणाऱ्या प्रशांत साळुंखे या तरुणाला त्यांच्या दुकानातून आग व धूर येत असल्याचे दिसले. त्याने तातडीने भोगावकर व ग्रामस्थांना याची कल्पना दिली.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानाचे शटर उघडणे अशक्य झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांना तातडीने पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने शटर तोडून सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आगीत दुकानातील प्लास्टिक साहित्य, शेती अवजारे, प्लास्टिक पाइप, दोऱ्या, कपाटे, संसारोपयोगी वस्तू आणि वरील मजल्यावर ठेवलेले सर्व किमती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. तलाठी मकरंद आणेकर यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच मानसिंगराव नाईक, जिल्हा बँक संचालक रणधीर नाईक आणि महावितरणचे अधिकारी देशमाने यांनी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT