कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : कुपवाड – मिरज एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या मिरज एमआयडीसी हद्दीतील गंगा प्लास्टिक या कंपनीत शनिवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत कंपनीतील प्लास्टिक स्क्रॅप, मशीनरीसह संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. कंपनी शेजारील अन्य दोन कंपन्यांच्या साहित्यांना लागलेल्या आगीत किरकोळ नुकसान झाले.
मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने क्षणातच रौद्ररुप धारण केले. आगीचे लोळ आकाशाला भिडले होते. संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता. आग लागल्याची माहिती शेजारील कंपनीतील एका कामगाराने मालक हिंमत यांना फोनवरून दिली. त्यांनी कुपवाड एमआयडीसी, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अग्निशमन विभाग तसेच कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. तीनही अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी व जवानांनी तीसहून अधिक अग्निशमन बंबांचा वापर करून अतिशय मेहनत घेऊन तब्बल पाच तासानंतर आग आटोक्यात आणली. प्रसंगावधानाने जीवितहानी टळली. आग कशी लागली, याचे कारण समजू शकले नाही. आगीत कंपनीतील ग्रँडीग मशीन, प्रेस मशीन, पोलो लायझर या तीनही मशीनरी जळून खाक झाल्या.
शेजारी असणार्या दोन कंपन्यांच्या भिंती व वातानुकुलित यंत्रणांना आग लागल्याने त्यांचेही किरकोळ नुकसान झाले. आग लागताच शेजारील सर्व कंपनीतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कुपवाड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.