स्वप्निल पाटील
मिरज : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणार्या मिरज रेल्वे स्थानकातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानकातील जनरल वेटिंग रूममध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, स्वच्छतेअभावी या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचीच अवस्था अस्वच्छ झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृहाची तातडीने स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीसह प्रवासी संघटनांनी केली आहे.
मिरज रेल्वे जंक्शनमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक प्रवासी मिरज स्थानकावरून विविध दिशांना जाणार्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करतात. अनेक प्रवाशांना रेल्वे सुटण्यापूर्वी बराच वेळ स्थानकावर थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांसाठी असलेल्या जनरल वेटिंग रूमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, याच वेटिंग रूममधील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे प्रवाशांना या ठिकाणी जाणेही त्रासदायक ठरत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. स्वच्छतागृहाची अवस्था पाहता अनेक प्रवाशांना नाइलाजाने रेल्वेगाडीतील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या मूलभूत सुविधांचाच उपयोग होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रवाशांकडून तसेच प्रवासी संघटनांकडून वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई, आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मिरज हे केवळ सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित नसून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. अशा महत्त्वाच्या जंक्शनवरील मूलभूत सुविधांची ही अवस्था रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने स्वच्छतागृहाची स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच नियमित स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
रेल्वे सल्लागार सदस्य नेमके करतात काय?
रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि स्थानकांवरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे सल्लागार सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, मिरज रेल्वे जंक्शनमधील जनरल वेटिंग रूममधील स्वच्छतागृहाची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास कशी आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रवाशांना भेडसावणार्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सल्लागार सदस्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र, या प्रश्नावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. सल्लागार सदस्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचा आणि नियमित स्वच्छतेचा प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे लावून धरावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.