पलूस : पलूस तालुक्यातील आमणापूर, अनुगडेवाडी, मळीभाग, शेरीभाग आणि आता सावंतपूर या परिसरात सलगपणे होत असलेल्या तरससदृश हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यांनी शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत या प्राण्याच्या हल्ल्यात 19 शेळ्या आणि एक बोकड ठार झाले आहे, तर एक शेळी अद्याप बेपत्ता आहे. अनेक शेळ्या जखमी झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकर्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत असून, वन विभागाचे प्रयत्न केवळ पंचनाम्यापुरतेच मर्यादित असल्याची नाराजी शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्राण्यांचा वावर अद्यापही सुरू आहे, मात्र ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जून महिन्यात अनुगडेवाडीत या प्राण्याने पहिला हल्ला केला. त्यानंतर आमणापूरमधील शेरी भागात तीन शेळ्या आणि एक कोकरू ठार झाले. याच रात्री विलास पाटील यांचे कोकरू उचलून नेले. आमणापूर भोईगल्ली येथे मध्यरात्री उत्तम पवार यांच्या गोठ्यात घुसून या प्राण्याने एक गाभण शेळी आणि एक बोकड ठार केले. त्यानंतर चार दिवसात हल्ल्यात रात्री यशवंत अनुगडे यांची शेळी ठार झाली, एक कोकरू जखमी झाले. आनंदा ज्ञानू अनुगडे, गोविंद धनवडे, कृष्णा जाधव यांच्या शेळ्याही हल्ल्यात जखमी झाल्या.
या घटनेनंतर वन विभागाच्या वनरक्षक सुरेखा लोहार, वनपाल अशोक जाधव आणि पलूस पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत जनावरांची तपासणी करून जखमी प्राण्यांवर उपचार सुरू केले. मळी भाग आणि अनुगडेवाडीत ट्रॅप कॅमेरे बसवण्याची मागणी सरपंच बालिका पाटील यांनी केली. त्यानंतर ट्रॅप कॅमेरेही चौथ्या हल्ल्यानंतर लावले गेले. वनपाल अशोक जाधव यांनी गावातील युवकांना रात्री गस्त घालण्याचे आवाहन केले . तसेच गस्त वाढवण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती मोहीमही सुरू केली. कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास शेतकर्यांनी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. परंतु या सार्या उपाययोजना प्राण्यांचा हल्ला झाल्यानंतर सुरू होतात, हे विशेष!