आटपाडी ः शेजाऱ्याने आपल्या मुलींवर चोरीचा संशय घेतल्याने बापाने पोटच्या दोन मुलींना घरातच त्यांचे हात-पाय एकत्र बांधून मुटकुळं करून लटकवले आणि जोरदार मारहाण केली. या घटनेत एकीचा तडफडून-तडफडून मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ती रुग्णालयात उपचार घेत आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात घटना घडल्याचे बुधवारी सायंकाळी उघडकीस आले.
यामध्ये सानिका यमगर (वय 10) हिचा मृत्यू झाला, तिची बहीण अनुजा (11) ही गंभीर जखमी आहे. दादू हैबत यमगर (38) असे संशयित बापाचे नाव आहे. त्याच्यासह घरातील सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. यमगर याच्या शेजाऱ्याने, या मुलींनी आपल्या घरात चोरी केल्याचा संशय घेतला. त्यामुळे चिडलेल्या मुलींच्या बापाने माणुसकीलाच उलटे लटकवले. मुलींच्या रात्रभर चाललेल्या या अमानुष छळामुळे सानिकाने अखेर वेदनांना हार मानत प्राण सोडले, तर अनुजा जखमी आहे.
हा प्रकार बाहेर येऊ नये, म्हणून कुटुंबीयांनी सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. आई-वडील, आजी-आजोबा आणि काही नातेवाईकांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न यांसारखे गुन्हे याबाबत दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
अनुजा बोलली अन् धक्कादायक घटनेचा भांडाफोड झाला
मृत्यूशी झुंज देणाऱ्या अनुजाने या सगळ्या क्रौर्याचा पर्दाफाश केला. शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात, ‘वडिलांनी आम्हाला उलटे टांगले आणि मारहाण केली,’ असे स्पष्ट सांगितले. या एका वाक्याने संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला. डॉक्टरांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
डॉक्टरांमुळे सत्य उघडकीस
सानिकाचा मृत्यू झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर तिची आत्या व मामा घटनास्थळी दाखल झाले, पण वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी जखमी अनुजाला खासगी रुग्णालयात दाखल केले. एक मात्र झाले, तिच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे तिच्या प्रकृतीचा धोका टळला. रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवल्यामुळे दुपारी अडीच-तीन वाजता ही घटना उघडकीस आली.