Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : ट्रॅक्टर-ट्रेलरला दुचाकी धडकून १६ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

दिघंचीजवळ अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथे दिघंची ते झरे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात १६ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवार, दि. १२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दिघंची ते झरे रस्तावरील सुरेश नामदेव शिंदे यांच्या पंक्चरच्या दुकानासमोर घडला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश रघुनाथ पट्टेकर (वय १६, सध्या रा. दिघंची; मूळ रा. मालवाड, ता. हल्याळ, जि. कारवार, कर्नाटक) असे मृत मुलाचे नाव आहे. तर दुचाकी चालविणारा आकाश हणमंत गौडा (वय २२, रा. दिघंची; मूळ रा. नंदीगड्डा, ता. हल्याळ, जि. कारवार) या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दुचाकीस्वार आकाश गौडा हा दुचाकीवर मागे आकाश पट्टेकर याला बसवून जात होता. हे दोघेही रस्त्यालगत असलेल्या दुकानात झोपण्यासाठी निघाले होते. दरम्यान, संशयित ट्रॅक्टरचालक तुकाराम पांडुरंग खिलारी (रा. चिकमहूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर व जोडलेला ट्रेलर रस्त्याच्या डाव्या बाजूला धोकादायक स्थितीत उभा केला होता.

याचवेळी समोरून येणाऱ्या एका वाहनाच्या तीव्र प्रकाशझोतामुळे रस्त्यावर उभा असलेला विना-रिफ्लेक्टर ट्रॅक्टर व ट्रेलर दुचाकीस्वाराला अंधारात दिसला नाही. त्यांची दुचाकी थेट ट्रेलरच्या मागील उजव्या चाकाला जाऊन धडकली. या धडकेत दुचाकीस्वार आकाश गौडा याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर दुचाकीवर मागे बसलेल्या अल्पवयीन आकाश पट्टेकर याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आटपाडी पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालक तुकाराम खिलारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT