सांगली

सांगली : भिवघाट रस्त्यावरील मेटकरवाडीत दूध दरासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

backup backup

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी भिवघाट रस्त्यावर मेटकरवाडी फाटा येथे दूध दर वाढीसाठी आज (दि. १०) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान तहसीलदार सागर ढवळे यांनी १३ तारखेला याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आटपाडी तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर दिला जात नाही. शेतीला हमीभाव नसल्याने शेती परवडत नाही. त्यामुळे लाखो रुपये कर्ज काढून गाई म्हैशी खरेदी केल्या आहेत. परंतु दुधाचे दर पडल्याने व पशुखाद्य चारा यांचा दर वाढल्याने आता दुग्ध व्यवसाय देखील परवडेना झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

शासनाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च धरून गाईच्या दुधाला ४२ व म्हैशीच्या दुधाला ६५ भाव द्यावा अशी मागणी आहे. परंतु त्याप्रमाणे दर दिला जात नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि. १०) मेटकरवाडी फाटा येथे ऋषिकेश दिगंबर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सुखदेव माळी, प्रकाश गायकवाड, विजय कोळी नवनाथ मेटकरी, सर्जेराव यमगर, विजय पाटील, सचिन देशमुख, आदिनाथ मेनकुदळे, शहाजी यमगर, गोरख कदम, बापुराव मंडले, अमित गिड्डे, ऋषिकेश पाटील व शेतकरी सहभागी झाले होते.

घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आंदोलक आणि तहसीलदार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दूध संकलक, डेअरी चालक यांची आणि आंदोलकांची बैठक तहसीलदार यांनी घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान रास्ता रोकोमुळे मेटकरवाडी येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

SCROLL FOR NEXT