मारुती पाटील
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यात सध्या दोन राष्ट्रीय आणि तीन राज्य महामार्गांच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, मुदत संपूनही यातील अनेक कामे मार्गी लागलेली नाहीत. अशा स्थितीत आता शक्तिपीठ या नवीन महामार्गाचा प्रपंच कशासाठी? हा प्रश्न आहे.
तालुक्यातून सध्या पुणे-बंगळुरू आणि विजापूर-गुहागर हे राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यात आता शक्तिपीठ प्रकल्पासाठी तालुक्यातील सुमारे 852 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. जेवढी जमीन जाईल, त्याच्या चौपट जमीन या मार्गामुळे पाणी साचून नापीक होण्याची भीती आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तर अनेक रस्ते अतिक्रमणामुळे धोकादायक बनले आहेत. ही अतिक्रमणे काढून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याची खरी गरज आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. या कामाची मुदत संपत आली तरी, पेठनाका ते कागलपर्यंतचे केवळ 45 टक्केच काम पूर्ण झाले आहे. सातारा ते कागल या 133 किलोमीटरसाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत, मात्र सध्या हे काम बंद आहे. काही वर्षांपूर्वी गुहागर-विजापूर या 320 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले, पण यातील काही टप्प्यांचे काम अपुरेच आहे.
दुसरीकडे, 800 कोटी रुपये मंजूर असलेल्या पेठ-सांगली मार्गाचे काँक्रिटीकरण नुकतेच पूर्ण झाले असले, तरी वाकुर्डे बुद्रुक ते पुसेसावळी या 70 किलोमीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रडत-खडतच सुरू आहे. यासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. याशिवाय 80 कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या शिराळा ते आष्टा या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही संथगतीने सुरू आहे.