देवराष्ट्रे : जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी अर्थवाहिनी बनलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी रामापूर, बलवडी व जाधवनगर येथील शेतकऱ्यांनी योजनेच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीचा निषेध केला. यामुळे काहीवेळ कार्यकारी अभियंत्यांसह अधिकारी कार्यालयात कोंडून पडले होते. यावेळी रामापूर येथील एका शेतकऱ्याने मुख्य कार्यालयासमोर अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
योजनेच्या वितरिका क्र.3 चे काम बंदिस्त वितरण प्रणालीमध्ये करण्यात आले आहे. या वितरिकेतून देवराष्ट्रेचा काही भाग, रामापूर, बलवडी, जाधवनगर आणि शिरगावच्या काही भागातील शेतीला पाणी वितरित करण्यात येते. मात्र मागील आवर्तनापासून शेतकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप होत आहे. चालू आवर्तन सुरू होऊन बारा दिवस झाले तरी येथील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने शेतकरी योजनेच्या मुख्य कार्यालयासमोर जमा झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांनी वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजर झाले. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा न करताच अधिकारी थेट कार्यालयात गेल्याने शेतकरी जास्तच आक्रमक झाले.
शेतकरी अधिकाऱ्यांना बाहेर येऊन चर्चा करा, अशी मागणी करीत होते. मात्र अधिकाऱ्यांनी काही लोकांना ‘कार्यालयात या, चर्चा करूया’ अशी विनंती केली. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे काहीवेळ अधिकारी बाहेर येतात का, याची वाट पाहून शेतकऱ्यांनी योजनेच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराचे शटर बंद करून अधिकाऱ्यांना आत कोंडून टाकले. काही वेळानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने शटर उघडून अधिकाऱ्यांना बाहेर बोलावण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी या वितरिकेचे काम निकृष्ट झाले असून सहायक अभियंता व्ही. ए. मुलाणी हेच याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करून आम्हाला पाणी द्या, अशी मागणी केली. चर्चेनंतर कार्यकारी अभियंता प्रज्ञा पाटील यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये बंदिस्त पाईपची दुरुस्ती करून पाणी देण्याचे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
कार्यालयातच दोरी अडकवून गळफासाचा प्रयत्न
पाण्याअभावी उभे पीक वाळून चालल्याने त्यातच अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तरे मिळत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद यादव यांनी अधिकाऱ्यांसमोरच कार्यालयात दोरी अडकवून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी यादव यांना अडवून आत्मदहनापासून परावृत्त केले.