शेतकर्‍यांना शासनाच्या प्रयोगशाळेची प्रतीक्षा 
सांगली

Sangli : शेतकर्‍यांना शासनाच्या प्रयोगशाळेची प्रतीक्षा

राजकीय नेत्यांकडून वर्षानुवर्षे केवळ घोषणाच

पुढारी वृत्तसेवा
शशिकांत शिंदे

सांगली : जिल्ह्यात पिकांचे पान, देठ, फळ तपासणीसाठी शासनातर्फे अत्याधुनिक प्रकारची लॅब (प्रयोगशाळा) उभारण्याची घोषणा अनेकवेळा झाली. त्यासाठी वेगवेगळी ठिकाणे व त्यांचे प्रस्तावही तयार झाले. मात्र याची अंमलबजावणी झालेली नाही. सध्या सर्वत्र एआय चा बोलबाला सुरू आहे. शेती क्षेत्रात त्याच्या वापरासाठी अगोदर सुसज्ज प्रयोगशाळा गरजेची आहे. मात्र ती अजून सुरू झालेली नाही. मग एआय कसे वापरायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

सध्याचा जमाना हा एआय चा मानला जात आहे. सर्वच क्षेत्रात याचा वापर सुरू झाला आहे. शेती क्षेत्रातही याच्या वापरामुळे मोठी क्रांती होईल असे बोलले जात आहे. ऊसशेतीसाठी याचा वापर सुरू झालेला आहे. याच्या वापरामुळे एकरी शंभर टनावर उत्पादन जाते, असे सांगण्यात येत आहे. इतर पिकांच्याबाबतीतही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचा वापर करण्याअगोदर जमिनीची माती, पाणी, पिकातील पान, देठ, त्याचे फळ याचे परीक्षण करण्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा आवश्यक आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी अनेक घोषणा झाल्या. नेते माजी आमदार अनिल बाबर यांनी विटा येथे ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचीही, अशा प्रकारची प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी असून ते प्रयत्न करीत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनेही मिरज येथील समितीच्या आवारात प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊन प्रयोगशाळा उभारण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी विविध घोषणा करण्यात आल्या, त्यामध्येही एक घोषणा होती.

जिल्ह्यात, द्राक्षे डाळिंब, भाजीपाला आदी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उच्च शिक्षण घेतलेले तरुण शेतीमध्ये उतरत आहेत. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळताना दिसत नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकरी गुणवत्तेची द्राक्षे जगाच्या बाजारपेठेत पाठवतात. हीच द्राक्षे रेसिड्यू फ्री आहेत का, याची तपासणी करावी लागते. मात्र ही तपासणी करणारी यंत्रणा जिल्ह्यामध्ये नाही. पुणे शासनाच्या लॅबमध्ये त्याची तपासणी करावी लागते. मात्र राज्यभरातून या ठिकाणी शेतकरी येत असल्याने त्या ठिकाणी वेळेवर तपासणी होत नाही. त्यामुळे मुंबई, हैदराबाद येथील खासगी लॅबमध्ये शेतकरी तपासणी करून घेतात. एका नमुन्याचे 200 घटक तपासणी केली जातात. त्यासाठी घटकानुसार आठ ते बारा हजार रुपये शुल्क आकारणी केली जाते. जिल्ह्यातून प्रत्येकवर्षी केवळ द्राक्षाचेच सुमारे 3000 शेतकरी नमुने पाठवतात. सांगलीत ही लॅब सुरू झाल्यास शेतकर्‍यांचा वेळ व खर्चही वाचणार आहे.

आता यापुढील काळात द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला या पिकांमध्येही एआय चा वापर सुरू होणार आहे. त्यादृष्टीने संशोधन आणि प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासाठी लागणारी लॅबसारखी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शासनाचा जिल्हा मृदा चाचणी विभाग माती परीक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांत जागृती करत आहे. राष्ट्रीय कृषी विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा खरीप हंगाम, रब्बी हंगाम, मूल्यसाखळी योजना, भात सुधार प्रकल्प आणि सेंद्रिय शेती योजना या योजनांद्वारे माती परीक्षण केले जाते. जिल्ह्यात सन 2024-25 या वर्षात 17 हजार 789 नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी डिसेंबरअखेर 15 हजार 72 नमुने प्राप्त झाले आहेत. 6 हजार 696 माती नमुन्यांची तपासणी केली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या मातीमध्ये नत्राचे प्रमाण कमी असल्याचे पुढे आले आहे.

या शेतकर्‍यांना पिकांच्या खतांच्या शिफारशीसह आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. मृदा चाचणी विभागात माती नमुना यामध्ये सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, तर सूक्ष्म मूलद्रव्य नमुना तपासणीमध्ये तांबे, लोह, मँगेनीज, झिंक आणि पिकासाठी पाणी नमुना तपासणीमध्ये सामू, विद्युत वाहकता, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, क्लोरिन, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट, एकूण विद्राव्य क्षार सोडिअमचे प्रमाण तपासले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT