बुधगाव : पाटील नुसता इशारा देऊन थांबले नाहीत. प्रशासनाने आपला इशारा गांभीर्याने घ्यावा, यासाठी त्यांनी शेतात ‘सेटअप’च लावला आहे. पाटील यांच्या शेतातून उभ्या-आडव्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. त्यांच्या अडीच एकर क्षेत्रात एक-दोन नव्हते, तर विजेचे सात खांब आहेत. शेतातून जाणाऱ्या वीजवाहिन्यांच्या खाली त्यांनी लोखंडी पाईप, बांबूच्या मदतीने २० फूट उंचीचा एक टॉवरच उभा केला आहे.
बुधगाव (ता. मिरज) येथे प्रगतिशील शेतकरी धनाजी आकाराम पाटील यांच्या उसाच्या शेतात सहा महिन्यांपूर्वी वीज महावितरणच्या वाहिनीतून ठिणग्या पडून अडीच एकर ऊस जळून खाक झाला होता. वारंवार पाठपुरावा करूनही त्याची अद्याप एक रुपयाचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही; त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पाटील यांनी विजेच्या तारांना हात लावून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
धनाजी पाटील यांची बुधगाव-बिसूर रस्त्यालगत अडीच एकर शेती असून, या शेतीत वीजवाहिन्यांचे सात खांब आहेत. या तारांमधून ठिणग्या पडल्याने ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात उसाला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने अडीच एकर ऊस जळून भस्मसात झाला. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली; मात्र या आगीत लागण आणि खोडवा उसाचे मिळून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले, तसेच ठिबक सिंचनाचे साहित्यही जळून नष्ट झाले.
घटनेनंतर तलाठी, महावितरण आणि कृषी विभागाने पंचनामा केला. पंचनामा अहवाल सादर होऊन जवळपास पाच महिने उलटले, तरी महावितरणकडून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या काळात साखर कारखाने आणि गुऱ्हाळे बंद असल्याने जळालेला ऊस दोन महिने शेतातच पडून राहिला; त्यानंतर तो ऊस तोडून जमीन पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च करावा लागला. परिणामी, शेतीवरच अवलंबून असलेल्या पाटील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
महावितरणच्या बुधगाव, सांगली आणि पुणे कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे धनाजी पाटील यांनी सांगितले. प्रशासनाच्या वेळकाढू कारभाराला कंटाळून टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महावितरण, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले असून, आठ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास शेतातून गेलेल्या विजेच्या तारांना हात लावून आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.