आष्टा : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून दोन शेतकऱ्यांची ३७ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील दोघांविरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश बाबूसिंग आडे आणि बाबूसिंग अमृत आडे (दोघे रा. सोहरा खुर्द, ता. महागाव, जि. यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत राजाराम पाटील (वय ३७, रा. पांढरमळा, बागणी, ता. वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ ते २०२६ या कालावधीत संशयितांनी फिर्यादी प्रशांत पाटील व त्यांचे भाऊ सुशांत पाटील यांचा विश्वास संपादन केला. ‘तुम्हाला ऊसतोड मजूर पुरवतो’, असे सांगून संशयितांनी त्यांच्याकडून ऑनलाइन बँक ट्रान्सफरद्वारे टप्प्या-टप्प्याने एकूण ४५ लाख २४ हजार रुपये घेतले.
मात्र, पैसे घेतल्यानंतरही संशयितांनी मजूर पुरवले नाहीत. पाटील बंधूंनी तगादा लावल्यानंतर संशयितांनी त्यातील ७ लाख ९० हजार रुपये परत केले; परंतु उर्वरित ३७ लाख ३४ हजार रुपये परत न करता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशांत पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.