सांगली : कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात सांगली जिल्ह्यातील ८ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५२ हजार १८४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत, तर यातील आधार प्रमाणीकरण व अन्य निकष पूर्ण केलेल्या हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६८ हजार ९८१ पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ५६ हजार ९६२, तर राष्ट्रीयीकृत बँकांची १२ हजार १९ कर्जखाती आहेत. यातील शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये जिल्ह्यातील ३८ हजार ४१० पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. त्यापैकी ३१ हजार ९४४ पात्र लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील जिल्हा बँकेच्या १९ हजार ७२६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १३२.८५ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या १ हजार ९९९ लाभार्थ्यांच्या खात्यावर २३.६९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
शासनाच्या कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील ४ हजार ९९, तर तिसऱ्या यादीत ११९१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. दोन दिवसांपूर्वी शासनाने चौथी यादी जाहीर केली असून यात सांगली जिल्ह्यातील ८ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत चारही यादीत मिळून जिल्ह्यातील ५२ हजार १८४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व अन्य निकष पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बॅँक खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे.