सांगली

स्पीड पोस्टने सांगलीचा फराळ निघाला परदेशात

दिनेश चोरगे

सांगली :  कोरोनानंतर स्पीड पोस्ट आणि कुरिअर सेवांचा व्यवसाय जोमाने सुरू झाला. या सेवांमुळे प्रत्येक गोष्ट घरपोहोच मिळू लागली. दिवाळी फराळ आणि इतर भेटवस्तू देशभरात किंवा परदेशात कुठेही पाठविण्यासाठी स्पीड पोस्टचा पर्याय निवडण्यात येत आहे. रोज 100 ते 110 पार्सल सध्या स्पीड पोस्टने जात आहेत.

सांगलीत 49 कुरिअर सेवा कार्यरत आहेत. त्याद्वारेही रोज फराळाचे साहित्य, कपडे, भेटवस्तू पाठविल्या जातात. कमीत कमी 1 किलो आणि जास्तीत जास्त 5 किलोपर्यंत फराळ पाठवला जातो. त्याचे योग्य पद्धतीने पॅकिंग केले जाते आणि वजनानुसार आकार घेऊन तो रेल्वे व नंतर विमानाने परदेशात पाठविण्यात येतो. महाराष्ट्रातून परदेशात फराळ पाठविण्याचे प्रमाण अधिक आहे. खमंग व तळलेले पदार्थ फराळातील मुख्य घटक असल्याने ते वेळेत व अलगदपणे नातेवाईकांपर्यंत पोहोच करण्याचे काम स्पीड पोस्ट व कुरिअर सेवा करतात.

पूर्वी पोस्ट कार्डाचे शुभेच्छापत्र बनवून दिवाळीला नातेवाईकांना पाठवले जायचे. आता ऑनलाईनचा जमाना आल्याने ई-शुभेच्छा पाठवल्या जातात. पोस्टात दहा रुपयात ऑनलाईन शुभेच्छा ग्राहकांनी निवडायच्या आणि त्या एका पोस्टाकडून दुसर्‍या पोस्टाकडे पाठवल्या जातात. तेथून त्या आपल्या आप्तस्वकीयांना प्राप्त होतात. यंत्रणा गतिमान झाली, मात्र भावना पूर्वीइतक्याच निर्मळ आहेत. त्यामुळे कितीही कष्ट पडले तरी, फराळ तयार करून बाहेर शिकायला गेलेल्या मुलांसाठी पाठवण्याचा आटापिटा माता-भगिनी करत आहेत. सीमेवर लढणार्‍या जवानांसाठीही फराळ पाठवला जात आहे.

दिवाळीचा फराळ सर्वाधिक अमेरिका, यूएई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इंग्लंड या देशांमध्ये पाठविण्यात येतो. देशभरात दिल्ली, मद्रास, बंगळूर, मणिपूर आणि हैदराबाद येथे अधिक जातो. जिथे मोठी विद्यापीठे व अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, तिथे फराळ पोहोच व्हावा, यासाठी दिवाळीपूर्वीचे आठ दिवस अत्यंत धावपळीचे ठरतात.

कोरोनानंतर परदेशात पार्सल पाठविण्यात वाढ

शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात गेलेल्या किंवा स्थायिक झालेल्या नातेवाईकांना दिवाळीचा फराळ पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट, कुरिअर सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. दिवाळीपूर्वी पंधरा दिवस भेटवस्तू, कपडे, फराळ आणि शुभेच्छा पत्रे पाठवली जातात. जेणेकरून दिवाळीत आप्तांना या वस्तू वेळेत मिळू शकतील. स्पीड पोस्ट आणि ई-शुभेच्छा यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

पार्सल सेवेत देशात आणि विदेशात स्पीड पार्सल आणि आंतरराष्ट्रीय एअर पार्सलचा सर्वाधिक वापर केला जातो. दिवाळीचा हंगाम पूर्ण होईपर्यंत हे पार्सल बुकिंग रोजच शेकडोच्या घरात होते. परदेशातील मित्रपरिवारासाठीही फराळ पाठवला जातो. त्यांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी डाक विभागही तत्परतेने कार्यरत आहे.
– रमेश पाटील, सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोस्ट

SCROLL FOR NEXT