कुपवाड : शहरातील एका सराईत गुन्हेगारास मिरजेचे प्रांताधिकारी यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हा सराईत गुन्हेगार हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून कुपवाड ते माधवनगर रस्त्यालगत असलेल्या रामकृष्णनगर परिसरात फिरत असताना कुपवाड पोलिसांनी त्याला जेरबंद केले. गणेश दशरथ गंभीरे (वय ३०, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
कुपवाड पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रकाश सांगोलकर व त्यांचे पथक बुधवार दि. १२ रोजी मध्यरात्री कुपवाड ते माधवनगर रस्त्यालगत असलेल्या रामकृष्णनगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी एक इसम संशयितरित्या फिरत असताना पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन कुपवाड पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गणेश गंभीरे असे नाव सांगितले. संशयित गणेश गंभीरे याला मिरजेचे प्रांताधिकारी यांनी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. पोलिसांनी संशयित गंभीरे याच्याविरोधात कारवाई केली.