मिरज : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नगरसेवक आझम काझी याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. आझम काझी यास पकडून त्याची कर्नाटकात रवानगी करण्यात आली.
दरम्यान, या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरजेत प्रभाग सहामधून राष्ट्रवादीतर्फे आझम काझी निवडून आला आहे. आझम काझी याच्यासह आठ जणांना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. या कारवाईविरोधात आझम काझी याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर एका महिन्यासाठी त्याच्यावरील हद्दपारीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. मात्र एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतरही तो मिरजेतच वावरत होता. शहर पोलिस ठाण्यातील हवालदार प्रवीण वाघमोडे यांनी मंगळवारी रात्री स्टेशन रोडवर आझम काझी यास पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर काझी याची जिल्ह्याबाहेर कर्नाटकातील कुडची येथे रवानगी करण्यात आली
सुमारे एक वर्षापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझीसह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले व मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर संशयितांविरोधात पोलिस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक घुगे यांनी आझम काझीसह आठ जणांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार मिरजेत प्रचारासाठी येण्यापूर्वी एक दिवस उमेदवार आझम काझी याच्यावर पोलिसांनी हद्दपारची कारवाई केल्याने खळबळ उडाली होती.