लिंगनूर : जत तालुक्यातील 65 वंचित गावांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचा ऐतिहासिक टप्पा उद्या पूर्ण होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. 1 मार्चरोजी बेळंकी (ता. मिरज) येथे या योजनेतील 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट (ब्रेक थ्रू समारंभ) होणार आहे.
सकाळी 11.30 वाजता विखे-पाटील यांचे बेळंकी हेलिपॅडवर आगमन होईल. सकाळी 11.40 वाजता ते बोगदा कार्यस्थळाकडे प्रयाण करू प्रकल्पाची पाहणी करतील. त्यानंतर त्यांच्या हस्ते ब्रेक थ्रूसाठी रिमोटची कळ दाबण्यात येईल, त्यानंतर ते उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करतील. पाटबंधारे विभागाचे अभियंता धनवडे म्हणाले, बेळंकी बोगद्याची लांबी एकूण 1600 मीटर आहे. या बोगद्याचा अडीच मीटर लांबीचा शेवटचा भाग शिल्लक असून, उद्याच्या ब्लास्टनंतर बोगद्याचे खोदकाम पूर्ण होईल. या बोगद्यातून 1700 डायच्या दोन मोठ्या पाईप्सद्वारे पाणी पुढे नेले जाईल. बेडग टप्पा ते जत या 57 किमी अंतरापैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या विस्तारित योजनेमुळे जत तालुक्यातील 65 गावांमधील पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. तीन टप्प्यांत पाणी उचलून ते पुढे नेले जाणार असून, डिसेंबर 2026 अखेर या पाईपलाईनमधून पाणी प्रवाहित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.