सांगली : काळीखण परिसराला पर्यटन स्थळ बनवण्याच्या दाव्याखाली उभारलेल्या लेझर लाईट शो आणि पाण्याच्या कारंजा प्रकल्पाने नागरिकांना प्रत्यक्षात जैविक धोक्याचा अनुभव देण्याची सोय करून दिली आहे. हे इव्हिनिंग रिट्रीट नव्हे तर डेंजर ट्रीट आहे, असा आरोप जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर, रवींद्र चव्हाण, सतीश साखळकर यांनी केला आहे. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पीपीई किट, मास्क आणि गॉगल घालून काळीखण कारंजा शो पाहिला.
चव्हाण, रुईकर म्हणाले, प्रेक्षकांवर कारंजातून उडणारे पाणी हे स्वच्छ नाही. सुवर्णक्षणांचा लेझर शो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर दुर्गंधीयुक्त पाण्याचे थेंब उडणे आणि आजू-बाजूला घाणेरड्या दुर्गंधीचा त्रास, हा संपूर्ण अनुभव स्मार्ट प्रोजेक्टच्या नावाखाली स्मार्ट यातना आहे. खणीतील दुर्गंधीयुक्त पाणी योग्य शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय कारंज्यातून उंच उडवले जाते. यामुळे सूक्ष्म थेंब प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर, कपड्यांवर, डोळ्यांत व तोंडात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सतीश साखळकर म्हणाले, काळ्या खणीचे पाणी निरुपद्रवी आहे, असे महापालिका म्हणत असेल, तर सर्व संबंधित अधिकारी व सल्लागारांनी सर्वप्रथम पीपीई किटशिवाय पहिल्या रांगेत बसून हा शो दररोज अनुभवावा. शंभोराज काटकर म्हणाले, महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना ‘इव्हिनिंग रिट्रीट’ असे इंग्रजी नाव देण्याची नामांकित कल्पना सुचवणाऱ्या व्यक्तीचा आम्ही स्टेशन चौकात सत्कार करणार आहोत.