मोटारीच्या धडकेत अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू  
सांगली

Sangli Accident : मोटारीच्या धडकेत अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

तासगाव बायपासवर अपघात; चालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव शहरातील बायपास रस्त्यावर बेंद्री फाट्याजवळ बुधवारी रात्री भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विघ्नेश सोमनाथ गडदे (वय २०, मूळ रा. तासगाव, सध्या रा. ईश्वरपूर, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील त्याचा मित्र सौरभ शामराव श्रीराम हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत विघ्नेशचा मित्र विभास वसंत तोडकर (वय २१, रा. मौजे डिग्रज, सध्या रा. ईश्वरपूर) याने तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालक अनिष हिरालाल अहुजा (वय २०, रा. तासगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विभास, मृत विघ्नेश, जखमी सौरभ तसेच त्यांचे मित्र रोहित बन्ने व करण सावंत हे सर्वजण ईश्वरपूर येथील आरआयटी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहेत. बुधवारी आषाढ महिन्यानिमित्त विघ्नेशच्या तासगाव येथील घरी मांसाहारी जेवणाचा बेत होता. जेवण आटोपून रात्री दहाच्या सुमारास हे सर्व मित्र दोन दुचाकींवरून ईश्वरपूरकडे परत जाण्यासाठी निघाले.

ते तासगाव बायपास रस्त्यावरील बेंद्री फाटा येथे आले असता, विघ्नेश आणि सौरभ यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १० एआर २००८) विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारीने (क्र. एमएच १० ईई ९९८२) जोराची धडक दिली. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने विघ्नेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

पोटचा गोळा गेला; आई-वडिलांचा आक्रोश

विघ्नेशचे वडील तासगावमधील प्रतिष्ठित पशुवैद्यक आहेत. विघ्नेशचा मोठा भाऊ राजस्थानमध्ये नोकरीला आहे. रात्री घरी मित्रांसोबत जेवण करून घराबाहेर पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच त्याच्या अपघाताची बातमी वडिलांना समजली. त्यांनी तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात धाव घेतली, मात्र तोपर्यंत विघ्नेशची प्राणज्योत मालवली होती. आपला पोटचा गोळा गेल्याने आई-वडिलांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. निस्तेज पडलेल्या विघ्नेशला पाहून मित्रांनाही अश्रू अनावर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT