सांगली : सांगली सिव्हिल हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हटवले. रस्त्यावरील व्यावसायिकांच्या छत्र्या, अतिक्रमित फलक जप्त करण्यात आले.
शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार अतिक्रमण विभागाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप घोरपडे यांच्या पथकाने कारवाई केली. महापालिकेच्या या कारवाईमुळे सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गारपीर चौक रस्त्याने मोकळा श्वास घेतला. मार्गावर दुतर्फा व्यावसायिकांनी व्यवसाय बोर्ड, हातगाडे, टेबल व खुर्च्या रस्त्यावरच मांडून अतिक्रमण केले होते. रुग्णवाहिका तसेच वाहतुकीला अडथळा येत होता. वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या मार्गावरील व्यावसायिकांची अतिक्रमण काढण्याची मागणी सातत्याने होत होती. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलपासून गारपीर चौक या मार्गावर खोक्यांसमोरील अतिक्रमणे हटवली.रस्त्यावर असणारे साहित्यही जप्त केले आहे.