सांगली : शहरातील फूटपाथवर हातगाडे, वाहने, अतिक्रमणे आणि व्यावसायिकांनी कब्जा मिळवला असून, पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. शहरातील एकही फूटपाथ आता अतिक्रमणापासून मुक्त राहिलेला नाही. याकडे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
येथील राममंदिर ते आझाद चौक, जुने स्टेशन रोड, महापालिका ते तरुण भारत स्टेडियम, बापट बाल शाळा परिसर, मध्यवर्ती बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापड पेठ, सराफ कट्टा, हायस्कूल रोड, पटेल चौक ते आमराई आणि आमराई ते कॉलेज कॉर्नर, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक परिसर, स्टँड रोड यावर फूटपाथ करण्यात आले असून, हे फूटपाथ चालण्यासाठी आहे, का ते वाहने लावण्यासाठी, दुकानांची टेबल, खुर्च्या ठेवण्यासाठी? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले पदपथ आज वाहन पार्किंग, हातगाड्या, खोके, दुकानांचे साहित्य, जाहिरात फलक आणि दुकाने, शोरूमचे कट्टे, पायऱ्यांनी व्यापले आहेत. स्टेशन चौकातील रस्ते आता जंक फूड, चायनीज खाद्य, चिकन ६५ हातगाडी चालकांनी व्यापले आहेत. फूटपाथपुढे वाहने लावली जात आहेत, यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. या ठिकाणच्या दुकानदारांची अरेरावीच चालू असते. रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. याची आता नागरिकांना सवय झाल्यामुळे महापालिकेकडे कोणी तक्रारही करताना आता दिसत नाहीत.
नगरसेवकही या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी, हातगाडी चालकांची मर्जी सांभाळत आहेत. याचा फटका मात्र ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, महिला आणि दिव्यांगांना बसत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका मात्र वाढत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी?
संविधानातील कायद्यानुसार पदपथावरून सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. जर रस्ता असेल, तर पादचाऱ्यांसाठी पदपथ निश्चित करून त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. हे स्थानिक प्रशासनाचे बंधनकारक कर्तव्य आहे, असा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र हा निकाल अद्याप महापालिकेला मिळाला नाही, असे सांगलीतील फूटपाथ पाहिल्यानंतर वाटते.
शहरातील फूटपाथ नावालाच आहेत. सर्वत्र अतिक्रमण आहे. हातगाडी चालक, छोटे दुकानदार, वाहन चालक कोणाचेही ऐकत नाहीत. याचा विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. नागरिकांच्याही हे आता अंगवळणी पडत चालले आहे. कधी अपघात झाला तर याची किंमत मोजावी लागेल. त्यापूर्वीच महापालिकेने याची दखल घ्यावी, एवढीच विनंती.- वसंतराव घोरपडे, ज्येष्ठ नागरिक संघटना, सांगली