Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime| उंबरगावात वृद्ध दाम्पत्याला काठीने मारहाण

नातवाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : तालुक्यातील उंबरगाव येथे नातवाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एका कुटुंबातील सहा जणांनी घरासमोर येऊन वृद्ध दाम्पत्याला काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सिध्देश्वर धुळा गाढवे (वय ५५) आणि त्यांची पत्नी ताराबाई गाढवे हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उंबरगाव येथे फिर्यादी सिध्देश्वर गाढवे यांच्या घरासमोर ही घटना घडली. फिर्यादी यांचा नातू बबन याने आरोपींना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून संशयित फिर्यादीच्या घरासमोर आले. 'तुझा नातू आम्हाला शिवीगाळ करीत आहे,' असे म्हणत त्यांनी वाद घातला. यावेळी आरोपींपैकी दोघांनी काठीने फिर्यादी सिध्देश्वर गाढवे यांच्या डाव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून पत्नी ताराबाई गाढवे या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही उजव्या हातावर काठीने मारहाण करण्यात आली. यावेळी इतर आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी बिरा धुळा गाढवे, प्रकाश बिरा गाढवे, विकास गाढवे, सखुबाई बिरा गाढवे, तेजश्री प्रकाश गाढवे आणि कांचन विकास गाढवे (सर्व रा. उंबरगाव, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आटपाडी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT