सांगली : नानाविध क्षेत्रात करिअर करण्याच्या हजारो संधी उपलब्ध आहेत. शिक्षण संस्था तुम्हाला ज्ञान देतीलच, पण कौशल्ये तुम्हाला मिळवावी लागतील. कारण सध्याचे युग स्पर्धेचे नाही, तर गुणवत्तेचे आहे. वीस वर्षे पुढचा विचार करून आता करिअर निवडा. तुम्हाला आवडेल आणि झेपेल अशा क्षेत्रातच करिअर करा, असा सल्ला पुणे येथील विविध विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी दिला.
सांगली येथे दैनिक 'पुढारी' व पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठ व डिजिटेक रोबोटिक्सतर्फे येथील रजपूत शैक्षणिक संकुलात आयोजिलेल्या पुढारी कॅम्पस टू करिअर या सेमिनारमध्ये रविवारी डॉ. स्वप्निल सोनकांबळे, डॉ. प्रशांत आचार्य, शंतनू देशपांडे, अभीद सलाती, राज जाधव, सार्थक दातीर यांनी मार्गदर्शन केले.
सांगली जिल्ह्यातील विविध कॉलेजीस् व अकॅडमीचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सेमिनारसाठी सांगलीसह जिल्हाभरातून प्रचंड संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. हॉल भरून गेला होता. या सेमिनारमधून करिअरबाबतच्या असंख्य प्रश्नांची हमखास उत्तरे मिळतील याची त्यांना खात्री होती. सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी पालक व विद्यार्थ्यांच्या साऱ्या प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला. . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. निवासी संपादक सुरेश गुदले, शाखा व्यवस्थापक युवराज पानारी, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे यांनी स्वागत केले. दीपक भोसले यांनी आभार मानले.
काय आवडत नाही याचाही विचार करा
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचे सहायक प्राध्यापक डॉ. स्वप्निल सोनकांबळे म्हणाले, मुलांना त्यांचे करिअर निवडायची संधी द्या. मुलांनीही तेच ते पारंपरिक क्षेत्र न पाहता नवीन क्षेत्रेही पाहावीत. ती पाहताना फक्त पदवीपुरता नाही, तर पुढील ३५ ते ४० वर्षे आवडीनुसार करिअर निवडा. इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक्., बी.ई. कोणताही पर्याय निवडू शकता. ॲग्रीकल्चर म्हणजे फक्त शेती नाही. आयात-निर्यातीसारखे पर्याय तिथेही उपलब्ध आहेत. सैन्यदलात जाणे, सीए होणेही प्रतिष्ठेचे आहे. आपणाला काय आवडते यापेक्षा काय आवडत नाही याचाही विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.
आवड-क्षमतेची सांगड घाला
डी वाय. पाटील विद्यापीठाचे प्रा. अभीद सलाती म्हणाले की, शिक्षण ही जीवनाची शिदोरी आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. आवड आणि क्षमता याची सांगड घातली पाहिजे. आगामी काळावर लक्ष ठेवून मार्ग निवडला पाहिजे. आपल्या देशाची ६० टक्के जनता ही युवा पिढीतील आहे. आपल्याबरोबरच देशाचा विकास घडवून आणला पाहिजे.
जग चालले पुढे...
राज जाधव म्हणाले, स्पर्धेपेक्षाही हे स्किलचे जग आहे. कोणत्याही क्षेत्रात असाल तर स्किल मिळवा, तरच टिकाल. शेती-उद्योग-आयटी-रोबो-एआय अशा क्रांती होत गेल्या. माणसानं सतत शिकत राहिलेच पाहिजे. मुलांच्या मागे ठामपणे उभे राहा. यशापयश-चढ-उतार येतच राहणार. बदलत्या जगाचे तंत्र शिकाल, तर स्वाभिमानाने जगाल. सतर्क राहा. वेळेची किंमत करायला शिका. जग खूप पुढे चालले आहे. मुलांच्या आवडी-निवडी, क्षमता व कल ओळखून त्यांना मोठे करा, असे आवाहन त्यांनी केले.