सांगली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत वाढत असल्याने खाद्यतेलाच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली. गेल्या तीन महिन्यांत 15 किलोच्या डब्यामागे 300-400 रुपयांनी वाढ झाली. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सरकी तेलाला सर्वाधिक मागणी आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे आगामी काळात आणखी 100 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता तेल विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
राज्यात अवकाळी पावसाने तेलबियांच्या पिकांवर विपरित परिणाम झाला. तेलबियांचे उत्पादन घटल्याने स्थानिक पातळीवर होणारी तेलनिर्मितीही घटली. परिणामी आयात तेलावरच अवलंबून राहावे लागत आहे. आता तेलदराची वाटचाल 200 रुपये लिटरच्या दिशेने सुरू झाली आहे. आणखी दोन महिने दरात वाढ होण्याचा शक्यता आहे.
खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही. त्यामुळे किराणा सामानात तेलाचा खर्च सर्वाधिक असूनही त्याची मागणी नेहमीइतकीच राहते. काटकसर करून जेमतेम एक लिटरभर तेलच कमी करता येऊ शकते. चार ते पाच जणांच्या कुटुंबाला महिन्याला किमान सात लिटर खाद्यतेल लागते. रोज किमान एक वाटी तेलाचा वापर सकाळ-संध्याकाळच्या स्वयंपाकात केला जातो. तळण्याचे पदार्थ करताना तेलाचा वापर अधिक होतो. सणवार असल्यास खाद्यतेल अधिक लागते.
जिल्ह्यात रोज अंदाजे 150 टन तेलाची उलाढाल होते. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे तेलाचा वापर कमी करणे शक्यच नाही. त्यामुळे परवडत असो अगर नसो, तेलाला पर्याय नाही. आता पुन्हा रशिया-युक्रेन, अमेरिका-इराण यांच्यातील युध्दजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे तेल दरातही सतत वाढ होत आहे. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सरकी उत्पादनातील घट यामुळे खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
आवाहनापूर्वीच काटकसरीचा धडा
गृहिणींना खाद्यतेलाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. तेलदराचा उच्चांक बघून गृहिणींनी आधीच तेलाची काटकसर सुरू केली आहे. त्यामुळे नव्याने काही करण्याची गरजच नाही. खाद्यतेलाच्या अति वापराने आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी महिला काटकसरीनेच तेलाचा वापर करतात.