सांगली

सांगली : मुले सांभाळत नसल्याने विठलापूर येथील दांपत्याची इच्छा मरणाची मागणी; तहसीलदारांना निवेदन

backup backup

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : चार मुले आहेत पण ती आम्हाला सांभाळत नाहीत. आम्हाला राहत्या घरातून हाकलले असून वृद्धापकाळात विविध व्याधींनी जगणे मुश्कील झाल्याने इच्छामरणास परवानगी मिळावी आणि बेघर केल्याबद्दल जेष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्याय मिळावा अशी मागणी विठलापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग विष्णु दिक्षित आणि त्यांची पत्नी शालन यांनी केली आहे.

याबाबत दिक्षित दांपत्याने तहसीलदार सागर ढवळे यांना पाठवलेल्या अर्जात म्हटले आहे की, आम्ही विठलापुर येथे राहतो. आम्हाला सुजित, संजय, सतिश, प्रविण अशी चार मुले आहेत. विठलापुर येथे दोन घरे आणि शेती आहे. ऑगस्ट महिन्यात मुलगा सतिशच्या नावे केलेल्या घरामध्ये आम्ही राहत होतो. पण सतिशने घरातून बाहेर जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे वडिलार्जित घर मिळकत क्रमांक ६३७ मध्ये राहण्यास गेलो असता दुसरा मुलगा प्रवीणने देखील आम्हाला हाकलून दिले. सध्या आम्ही आटपाडी येथे राहत आहोत. सुजित, संजय, सतिश आणि प्रवीण यांनी आमचा सांभाळ केला नाही. घरातून हाकलून लावून बेघर केले आहे. औषधपाणी, देखभाल करण्यास नकार दिला आहे.

आम्ही या चार मुलांचे पालनपोषण, संगोपन व्यवस्थित करून त्यांना चांगले शिक्षण दिले. त्यांना व्यवसाय उभारण्यास मदत केली. चौघांची थाटामाटात लग्ने लावून दिली. सुजित राज्य परिवहन महामंडळामध्ये अधिकारी आहे. संजय शेती करतो. सतिश व प्रविण ही दोन मुले सोनार कामाचा व्यवसाय करतात. चारही मुलांचे उत्पन्न चांगले आहे. मुलांनी आमच्या म्हातारपणी आम्हांला आधार बनून आमचा संभाळ करणे गरजेचे असताना आम्हांला घरातून हाकलून लावले आहे.त्यामुळे आमचे हाल सुरू आहेत. विठलापूर येथील दोन्ही घरे मुलांच्या ताब्यातून काढून आमची राहण्याची व्यवस्था करावी.सर्व मुलांनी आमचा सांभाळ करावा. औषधोपचार करावेत याबाबत मुलांना आदेश व्हावेत.अन्यथा अशा मरणयातना भोगण्यापेक्षा स्वेच्छा मरणाची मागणी या दांपत्याने निवेदनाद्वारे केली आहे.

शालन दिक्षित (वय ७७) यांचे हात व पाय मोडले आहेत. त्यांना हाताने कोणतेही काम होत नाही आणि पायांनी धडपणे चालता येत नाही. तर पांडुरंग दिक्षित (वय ७९) हे पाठीच्या व हृदयाच्या आजाराने त्रस्त आहेत. या दोघांची दिनचर्या कशीबशी सुरू असली तरी त्यांना मदतीची गरज आहे. परंतु पोटच्या पोरांनीच दुर्लक्ष केल्याने या वृद्ध दांपत्याला जीवंतपणी मरणयातना सोसाव्या लागत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT