सांगली

Sangli News: दुधगावात वीज कपातीवरून उद्रेक

‘महावितरण’ला लावले कुलूप; पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर तोडगा

पुढारी वृत्तसेवा

दुधगाव : शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यात वारंवार होणारी कपात आणि अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा अखेर उद्रेक झाला. विजेच्या प्रश्नावरून आक्रमक शेतकऱ्यांनी 'महावितरण'च्या उपकेंद्राला घेराव घालत थेट टाळे ठोकले. यामुळे काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रशासनाने तात्काळ मध्यस्थी केली. शेतकरी आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुधगाव येथे एकत्र बोलावून चर्चा घडवून आणली.

पोलिसांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतीसाठी अखंडित व निर्धारित वेळेत वीजपुरवठा करण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे अखेर या वादावर तोडगा निघाला. यामुळे शेतकरी व प्रशासन यांच्यातील संवादातून प्रश्न सोडवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

यावेळी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, महावितरणचे विश्रामबाग विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील, शाखाधिकारी गुरुप्रिया शिंदे, ऋतुराज शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील, पंचायत समिती सदस्या स्नेहल पाटील, उपसरपंच अविनाश भोसले व शेतकरी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT