सांगली : राज्यातील खरीप हंगामातील पर्जन्यमानाची तूट आणि अन्य घटकांचा विचार करून शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील केवळ मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत या चारच तालुक्यांचा समावेश झाल्याने उर्वरित तालुक्यांतील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींमधून नाराजी व्यक्त होत आहे. खानापूर, तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा, शिराळ्याचाही समावेश करण्याची मागणी होत आहे. खा. विशाल पाटील, आ. सुहास बाबर, माजी खासदार संजय पाटील, आ. सत्यजित देशमुख यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व सामाजिक, शेतकरी संघटनांनी निकष शिथिल करण्याची मागणी केली आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी शासननिर्णय जारी केला आहे. त्यानुसार जूनपासून आतापर्यंतच्या कालावधीतील पर्जन्यमानाची तूट तसेच अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये तातडीने पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.
दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांच्या यादीत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी चार तालुके सांगली जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील ८, सोलापूरमधील ११, सातारा जिल्ह्यातील ६ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील १० पैकी मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा समावेश आहे. निकष शिथिल करून खानापूर, तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यांत समावेश करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या यादीकडे लक्ष लागले आहे.
उर्वरित तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार : पालकमंत्री
खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व इतर घटकांचा विचार करून कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यात सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांमध्ये शासनाने 'ट्रिगर-१' लागू केला आहे. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे आणि संवेदनशीलतेने उभे आहे.
गेल्या आठवड्यातच जिल्हा प्रशासनाला पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आता जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांचा 'ट्रिगर-१'मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलती आणि दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या सर्व सवलतींचा प्रत्यक्ष लाभ अंतिम घटकापर्यंत आणि बाधित शेतकऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचावा, यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.