शिराळा : एप्रिलअखेरीस शिराळा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 22 तलाव पूर्ण कोरडे पडले आहेत. उर्वरित तलावांतील पाणीसाठाही 30 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
रेठरे धरणातील उपयुक्त पाणी साठा संपल्याने स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. सध्या या धरणात अवघे 9 टक्के पाणी शिल्लक आहे. शिवणी धरणात सुमारे 26 टक्के पाणी असले तरी, कालव्यापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने शिराळा, खेड व शिवणी परिसरातील ऊस व भाजीपाला पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडून आठ दिवस बंद ठेवण्याची पद्धत सुरू आहे. या धरणावर सुमारे 495 हेक्टर ऊस व 438 हेक्टर रब्बी क्षेत्र अवलंबून असून शिराळा शहर, एमआयडीसी तसेच उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगाव व मांगले गावांतील शेतीला या पाण्याचा लाभ होतो. मात्र सध्याच्या स्थितीत हा पुरवठा अपुरा ठरत आहे. करमजाई धरणात 91 टक्के पाणीसाठा असून त्या भागातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील इतर भागात स्थिती गंभीरच आहे.
कार्वे, शिवणी धरणांत पाणी सोडण्याची मागणी
वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कार्वे व शिवणी धरणात सोडण्याची तसेच आवर्तन वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी मागणी (द.ल.घ.फू.)
मोरणा - 179, करमजाई - 31, अंत्री - 24, शिवणी - 30,
रेठरे - 12, कार्वे - 19
प्रत्यक्ष मिळालेले पाणी (द.ल.घ.फू.)
मोरणा - 25, करमजाई - 91 भरले, अंत्री - 15, रेठरे - 7, शिवणी - 13.90,कार्वे - नाही.