Water Crisis Pudhari
सांगली

Sangli News : दोड्डनाला तलाव कोरडा पडल्याने शेतकरी आक्रमक

‘म्हैसाळ’चे पाणी न सोडल्यास उद्या ‘रास्ता रोको’

पुढारी वृत्तसेवा

जत : दोड्डनाला तलावातील पाणी पातळी मृत साठ्यावर (डेड स्टॉक) पोहोचल्याने प्रशासनाने उपसाबंदी लागू केली आहे. यामुळे निगडी बुद्रुक, उमदी, उटगी व जाडरबोबलाद परिसरातील शेतकरी अत्यंत संतप्त झाले असून, तलावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने सोडावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. पाणी न सोडल्यास सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी उमदी येथील नगर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दोड्डनाला तलावाच्या पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब, तूर आणि मका यांसह विविध पिकांची लागवड केली आहे. मात्र, तलावातील पाणी संपल्याने उपसाबंदी लागू करण्यात आली असून सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी हजारो एकरांवरील पिके वाळू लागली असून हाता-तोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी बळीराजा धडपडत आहे.

गतवर्षी म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे दोड्डनाला तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. यंदा मात्र तलाव कोरडा पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीत मुबलक पाणी उपलब्ध असताना आणि अलमट्टी धरणातून पाणी सोडले जात असताना, जतच्या सीमावर्ती भागातील तलाव कोरडा का, असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकातील लगतच्या भागातील कॅनॉलमध्ये पाणी सुरू असल्याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

या प्रश्नावर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित सिंचन विभागाला निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निगडी, उमदी, उटगी व जाडरबोबलाद परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT