सांगली : जिल्हा परिषदेत प्रशासक राजवट संपून लोकप्रतिनिधी सत्तेवर आले. त्यामुळे कारभाराला शिस्त लागेल, अशी आशा होती. मात्र आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मे महिन्यात सावळज व बोरगाव येथील आरोग्य केंद्रांची अचानक तपासणी केली. यावेळी आरोग्य सेवेतील गंभीर त्रुटी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना नोटीस बजावून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सावळज येथे बस्तवडे उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी काम करत होते, तर त्यांचे मूळ कामाचे ठिकाण असलेले बस्तवडे उपकेंद्र बंद ठेवण्यात आले होते. सावळजचे वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यांचा रजेचा अर्ज दाखवण्यात आला नाही. दुसरे वैद्यकीय अधिकारी हेही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या दोघांना खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
वर्षभरात केवळ १७ प्रसूती झाल्याचे नोंदीत दिसून आले. कुटुंब नियोजनाच्या १४३ उद्दिष्टांपैकी फक्त ३६ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. रुग्णवाहिकेचे लॉगबुक अपूर्ण असून लाखो रुपये खर्चून उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका महिन्याला अवघ्या तीन ते चार रुग्णांसाठी वापरली जात असल्याचे आढळले.
तासगाव तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तर तपासणीवेळी एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. एका अल्पवयीन मुलीने रुग्णालय बंद असल्याचे सांगितले. नंतर एका कर्मचाऱ्याला बोलावून घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर उपलब्ध होतात का, याची खात्री करण्यासाठी फोन लावण्यास सांगितले असता, संबंधित डॉक्टरांनी फोनही उचलला नाही. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नसल्याचेही स्पष्ट झाले.
या सर्व प्रकारांनंतर उपसंचालकांनी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना नोटीस बजावत संबंधितांकडून खुलासे मागवून कारवाई करण्याचे आदेश दिले. आता या अहवालावर आरोग्य समिती आणि जिल्हा परिषद प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.