सांगली ः याआधी उत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर होत होता, यंदा मात्र आगमनालाच डीजेचा दणदणाट सहन करावा लागला. त्यामुळे भाविक, नागरिकांना खूप त्रास झाला. गंभीर, धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारी पोलिस यंत्रणा मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.
गणेशोत्सव खरे तर आनंदसोहळा. काळाच्या ओघात उत्सवाच्या स्वरूपात बदल झाले, पण काही बदल मात्र जीवघेणे ठरत आहेत. तीन ते पाच वर्षे झाली, मूर्ती आगमनावेळी मुंबईसारख्या मिरवणुका आपल्याकडे काढल्या जात नव्हत्या. पारंपरिक वाद्यांच्या निनादात मूर्ती आणली जायची. पण आता मात्र डीजेचा दणदणाट सुरू झाला आहे. विसर्जन मिरवणुकीला डीजे मिळत नाही, म्हणून मूर्ती आगमनालाच अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढली. काही ठिकाणी डोळ्यांना इजा करणार्या लेसरचाही झगमगाट होता. डीजेच्या तालावर बेधुंद, ओंगळवाणे नाचणे, हे सर्व पोलिसांसमोरच सुरू होते. पोलिसांनी याकडे सोयीस्कर कानाडोळा केला. आता विसर्जन मिरवणुकीला काय होणार, याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.
काही वर्षांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी मिरवणुकीत आवाजाच्या नियमाचे उल्लंघन करणार्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून सर्व संबंधित साहित्य जप्त केले होते. त्यांच्या आठवणी लोक अजूनही काढतात. मग सध्याचे अधिकारी करतात तरी काय?
अलीकडे काही मंडळी वर्गणीसाठी सक्ती करीत आहेत. किमान पाचशे रुपयांची पावती फाडली जात आहे. त्यातून वादावादीचेही प्रकार घडत आहेत. दबावामुळे आर्थिक स्थिती नसतानाही पैसे द्यावे लागत आहेत. या पैशातून डीजे, जेवणावळी, बेधुंद होऊन नाचणे असे प्रकार वाढत आहेत.
येथील विजयनगर, कुपवाड या परिसरात बुधवारी सायंकाळी डीजेचा दणदणाट सुरू असल्याबाबत पोलिसांना सांगण्यात आले. पोलिस घटनास्थळी आले. त्यांच्यासमोरच हा दणदणाट सुरू होता, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.
मिरजेत एकूण तीन पोलिस ठाणी आहेत. मिरज शहर, मिरज ग्रामीण आणि महात्मा गांधी चौक अशी तीन ठाणी आहेत. तरीही मिरजेत डीजेचा दणदणाट सुरू असतो. कानठळ्या बसविणार्या आवाजाचा टिप्पिरा आसमंत भेदतो. पोलिसांना कान नसतात का? पोलिस जागेवरच कारवाई का करत नाहीत? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? सांगलीत, मिरजेत मागीलवर्षी अशा किती मंडळांवर कारवाई झाली? काय कारवाई झाली? ती यंदा तरी जाहीर का करत नाहीत? बडे-बडे अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरतात का? यापूर्वी काही अधिकार्यांच्या दरार्याची उदाहरणे आहेत. तसे प्रथा म्हणून का होत नाही? कोल्हापुरात बुधवारी डीजेचा दणदणाट झाल्यावर शंभरावर मंडळांच्या नोंदी आवाज क्षमता तपासण्याच्या यंत्राद्वारे घेण्यात आल्या. तशा नोंदी सांगली, मिरजेत होतात का? त्या रोजच्या रोज जाहीर का करत नाहीत?