election news
विधानसभा निवडणुक  file photo
सांगली

सांगली : जिल्ह्याची मतदार संख्या 24 लाख 54 हजारांवर

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची प्रारूप यादी प्रशासनाने मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार आता जिल्ह्यातील मतदारसंख्या 24 लाख 54 हजारावर पोहोचली आहे. मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदारसंख्येत 20 हजार 260 ने वाढ झाली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अवघ्या अडीच महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवरही तयारी सुरू आहे. मतदारयादी अंतिम करणे, मतदान केंद्रांची संख्या आणि तयारीसाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

मंगळवारी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 24 लाख 54 हजार 377 मतदार आहेत. यात पुरूष मतदार 12 लाख 50 हजार 756, स्त्री मतदार 12 लाख 3 हजार 487 व तृतीयपंथी मतदार 134 आहेत. जिल्हाभरात 61 नवीन मतदान केंद्राची भर पडली आहे. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली मतदार यादी ही सर्व मतदान केंद्र, तहसील आणि प्रांत कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ज्या मतदारांच्या नावात बदल करावयाचा आहे. तसेच नव्याने नाव नोंदणीसाठी मतदार अर्ज करू शकतील.

मतदार यादीमधील मतदारांच्या पत्त्यातील दुरूस्ती, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करण्यासाठी बदल करण्याची प्रक्रिया मतदान केंद्र अधिकार्‍यांमार्फत सुरूच राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण 134 तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे. यातील सर्वाधिक 68 मतदार सांगली विधानसभा मतदारसंघातील आहेत.

मतदान केंद्रांची संख्या अडीच हजारावर

गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या वाढली आहे. मतदारांना सोयीस्कर होईल असे नियोजन करताना 50 मतदान केंद्रांच्या नावात बदल, 137 केंद्रांच्या ठिकाणात बदल करत 99 केंद्रांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. 61 नवीन केंद्रांमुळे आता संख्या दोन हजार हजार 482 झाली आहे. यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात 307, सांगली 315, इस्लामपूर 290, शिराळा 334, पलूस-कडेगाव 285, खानापूर 356, तासगाव-कवठेमहांकाळ 308 व जत विधानसभा मतदारसंघात 287 मतदान केंद्रे आहेत.

SCROLL FOR NEXT