Sangli District Assembly Constituencies
विटा : देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेमुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय नकाशात मोठे फेरबदल होणार आहेत. केंद्र सरकारने ३३ टक्के महिला आरक्षण मान्य केले असून २०२९ ची निवडणूक याच आरक्षणासह घेण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या सध्याच्या ८ वरून १२ वर कशी पोहोचू शकते, असे विश्लेषण जेष्ठ विधिज्ञ ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केले आहे.
याबाबत शुक्रवारी (दि.१०) ॲड. मुळीक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दक्षिण भारतातील राज्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सध्याच्या लोकसभा सदस्य संख्येच्या दीडपट संख्या करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच नव्याने लोकसभा मतदारसंघांची निर्मिती करताना संपूर्ण राज्य हा निकष आहे. तसेच विधानसभा मतदारसंघांची निर्मिती करताना जिल्हा हा निकष असला पाहिजे असे कायद्यात आहे. शिवाय विधानसभा मतदार संघ निर्माण करताना पश्चिमेकडून पूर्वेकडे असे ही त्यांत नमूद आहे. या सूत्रानुसार महाराष्ट्रा तील लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२, तर विधानसभेच्या जागा २८८ वरून ४३२ होतील. याच धर्तीवर सांगली जिल्ह्यात सध्या असले ल्या ८ विधानसभा मतदारसंघांचे १२ मतदार संघ होतील.
पुनर्रचनेसाठी २०११ ची जनगणना आधारभूत मानली जाणार आहे. सांगली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ असून, १२ मतदारसंघांच्या हिशोबात प्रत्येक मतदार संघात सरासरी २ लाख ३५ हजार १७८ लोकसंख्या असणे अपेक्षित आहे. भौगोलिक सलगता विचारात घेऊन ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी मतदारसंघांची संभाव्य रचना मांडली आहे. त्यानुसार, पश्चिमेकडील शिराळा तालुक्याला वाळवा तालुक्यातील ७३ हजार लोकसंख्या जोडून पहिला मतदारसंघ तयार होईल. वाळवा तालुक्यातून दुसरा स्वतंत्र मतदारसंघ निघेल, तर वाळवा आणि मिरज तालुक्याच्या उर्वरित लोकसंख्येचा मिळून एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात येईल.
लोकसंख्येचा मोठा भार असलेल्या मिरज तालुक्यातून सांगली, मिरज आणि मिरज- कुपवाड ग्रामीण असे तीन मतदारसंघ निघू शकतात. तसेच पूर्व भागात जत आणि कवठे महांकाळ तालुक्यांचे मिळून दोन मतदारसंघ होतील. मध्य भागातील पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि तासगाव या पाच तालुक्यांच्या लोकसंख्येमधून ४ विधानसभा मतदारसंघ तयार होणे अपेक्षित असल्याचे ॲड. मुळीक यांनी स्पष्ट केले आहे.
एका लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ असतात. सांगलीत १२ मतदारसंघ झाल्यास दोन लोकसभा मतदारसंघ होऊ शकतात. मात्र, प्रादेशिक सलगतेनुसार सांगलीतील ६ मतदारसंघांचा एक लोकसभा आणि उर्वरित ३ मतदारसंघ शेजारील सातारा किंवा सोलापूर जिल्ह्यातील ३ मतदारसंघांना जोडून नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येऊ शकतो, असेही ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी आपल्या विश्लेषणात म्हटले आहे.
१) शिराळा, २) वाळवा, ३) वाळवा + मिरज, ४) सांगली, ५) मिरज, ६) मिरज कुपवाड ग्रामीण, ७) पलूस, ८) कडेगाव, ९) खानापूर + आटपाडी, १०) तासगाव, ११) कवठेमहांकाळ + जत, आणि १२) जत.