Sangli ZP Pudhari
सांगली

Sangli Swine Flu: जिल्ह्यात स्वाइन फ्लू ची एन्ट्री; यंत्रणा अलर्ट

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि आरोग्य संस्थांना सर्वेक्षणाच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इन्फ्ल्यूएंझाचा (स्वाइन फ्लू)चा एक रुग्ण वाळवा तालुक्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि आरोग्य संस्थांमध्ये फ्लूसदृश रुग्णांचे सर्वेक्षण नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंध व नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. फ्लूसदृश्य प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली.

हा संसर्गजन्य आजार असून संक्रमित व्यक्तीच्या खोकणे, शिंकणे किंवा बोलण्यामुळे त्याचा प्रसार होऊ शकतो. दूषित वस्तू अथवा पृष्ठभागाच्या संपर्कातूनही संसर्ग होण्याची शक्यता आहे. ताप, घसादुखी, खोकला, नाक वाहणे, अंगदुखी आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये उलटी-जुलाबाची लक्षणेही दिसू शकतात.

लहान मुले, ज्येष्ठ, गर्भवती महिलांना अधिक धोका

पाच वर्षांखालील मुले, विशेषतः एक वर्षाखालील बालके, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, मधुमेह किंवा हृदयविकार असलेले रुग्ण, स्थूल व्यक्ती तसेच फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड व चेतासंस्थेचे आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वाइन फ्लू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

संशयित रुग्णाच्या नाक अथवा घशातील स्त्रावाचा स्वॅब तपासणीसाठी घेतला जातो. स्वाइन फ्लू निदानासाठी प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

काय काळजी घ्यावी?

नागरिकांनी वारंवार साबणाने हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि धूम्रपान टाळावे. खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा. फ्लूसदृश लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

लक्षणे दिसताच आरोग्य केंद्राशी संपर्क करा

धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे किंवा ताप कमी न होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांमध्ये चिडचिड, खाण्यास नकार किंवा उलटी होत असल्यासही वैद्यकीय उपचार घ्यावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT