Crime News Pudhari File Photo
सांगली

Sangli crime : जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात जोरदार धुमश्चक्री

दोघे जखमी : 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील जिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळी कैद्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. स्थानबद्ध गुंड पवन धर्मेंद्र साळुंखे (वय 28) आणि त्याचा साथीदार मेघशाम उर्फ मोठ्या अशोक जाधव (वय 30) या दोघांवर कारागृहातील 16 जणांच्या टोळक्याने विटा फेकून हल्ला केला. यामुळे कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली.

याबाबत जखमी पवन साळुंखे याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य धनराज पवार, संजय ईश्वर गडदे, करण महादेव गायकवाड, नितीन वसंत दुधाळ, प्रशांत पंकज भगत, गणेशनिहाल आसिफ बावा, विनायक उत्तम सूर्यवंशी, अथर्व किशोर शिंदे, अनामी अविनाश कांबळे, तुषार संजय जीजरुडे, तेजस संजयसिंह राजपूत, निखिल अनिल यादव, तन्वीर हारुण जमादार, श्रीकांत दुर्योधन ढगे, रमेश मुकेश जाधव आणि राहुल विठ्ठल चव्हाण (सध्या सर्व रा.सांगली, सध्या जिल्हा कारागृह) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पवन साळुंखे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव साळुंखे आणि त्याचा साथीदार मेघशाम जाधव यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी सर्व कैद्यांना कारागृहातील मोकळ्या जागेत आणले असता, दुसऱ्या बराकीतील संशयितांनी ‌‘तुम्ही विभक्त कोठडीत असल्याने स्वतःला शहाणे समजता काय?‌’ असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून दोन्ही गटांत वाद उफाळला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आदित्य पवार याने चिथावणी दिल्याने टोळक्याने साळुंखे आणि जाधव यांच्यावर हल्ला चढवला. दोघे जीव वाचवण्यासाठी पळू लागले असता संशयितांनी त्यांच्यावर विटा फेकून मारल्या. या हल्ल्यात पवन साळुंखे याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT