सांगली ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 93.39 टक्के लागला. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 98.02 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 0.76 टक्क्यांनी निकालात वाढ झाली. कोल्हापूर विभागात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातील 66 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावर सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवर पाहिला. काही भागात नेटकॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांसह पालक निकालाची प्रत समाजमाध्यमांवर व्हायरल करत होते. अनेकांनी स्टेटस् ठेवला होता. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत होत्या.
जिल्ह्यात एकूण 325 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. 16 हजार 168 मुले आणि 15 हजार 39 मुली, अशा एकूण 31 हजार 207 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील 51 केंद्रांवर परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 हजार 628 मुले आणि 14 हजार 517 मुली, असे एकूण 29 हजार 145 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची टक्केवारी 90.47 टक्के, तर मुलींची 96.52 टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 98.02 टक्के लागला आहे. या शाखेत 17 हजार 910 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 557 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 353 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 82.96 टक्के लागला आहे. या शाखेत 8 हजार 162 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 6 हजार 772 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 1 हजार 390 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल 94.28 टक्के लागला आहे. या शाखेत 4 हजार 201 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 961 जण उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 240 आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 92 टक्के लागला आहे. या शाखेत 900 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 828 जण उत्तीर्ण झाले, तर 72 जण अनुत्तीर्ण झाले.
गेल्यावर्षी बारावीच्या निकालाची टक्केवारी 92.63 होती. यंदा त्यामध्ये 0.76 टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. तसेच कोल्हापूरचा दुसरा आणि सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची गुणपडताळणी करायची आहे, त्यांना दि. 6 ते 20 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
जिल्ह्यात 1 हजार 271 विद्यार्थी रिपिटर होते. त्यातील 784 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 487 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 61.68 टक्के आहे.
जिल्ह्यात शिराळा तालुक्याने सलग तिसर्यावर्षी निकालात आघाडी घेतली आहे. या तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 97.67 टक्के लागला आहे. कडेगाव तालुक्याचा निकाल 96.63 टक्के, पलूस -96.21, जत - 90.00, मिरज - 95.45, खानापूर - 94.47, वाळवा - 96.85, तासगाव - 93.21, आटपाडी - 92.68, कवठेमहांकाळ - 96.67, तर सांगली महापालिका क्षेत्राचा निकाल 90.28 टक्के लागला आहे.
कोल्हापूर : 94.40 टक्के
सांगली : 93.39 टक्के
सातारा : 92.76 टक्के