Sangli ZP Pudhari
सांगली

Sangli News : जिल्ह्यात डिजिटल प्रणालीद्वारे खत विक्री

काळाबाजार, साठेबाजीला बसणार आळा : घरातूनच करता येणार बुकिंग

पुढारी वृत्तसेवा

सांगली : खत विक्रीतील पारदर्शकता वाढविण्यासह काळाबाजार आणि अनधिकृत साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून फे्रमवर्क फर्टिलायझर सेल (एफ एफसी) ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्‍यांना घरबसल्या आपल्या हक्काच्या खताचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. जवळच्या अधिकृत विक्रेत्याकडील उपलब्ध साठ्याची माहितीही मिळणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

एफएफसी प्रणालीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत एफ एफसी मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करून नोंदणी करावी लागेल. आधार क्रमांक किंवा फार्मर आयडी टाकून ओटीपीद्वारे पडताळणी केल्यानंतर शेतकर्‍याची माहिती उपलब्ध होईल. ही प्रणाली अ‍ॅग्रीस्टॅकशी जोडलेली असल्याने शेतकर्‍याच्या नावावरील जमीन व ७/१२ संबंधी माहिती अ‍ॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शेतकर्‍याला संबंधित पीक निवडावे लागेल.

जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकानुसार खताची आवश्यकता प्रणालीद्वारे सुचविली जाईल. शेतकरी युरिया, डीएपी आदी आवश्यक खताची निवड करून गोण्यांची संख्या निश्चित करू शकतो. त्यानंतर जवळचे अधिकृत खत विक्री केंद्र निवडता येईल. संबंधित दुकानातील उपलब्ध खतसाठ्याची माहितीही अ‍ॅपवर दिसणार आहे.

बुकिंग पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍याच्या मोबाईलवर डिजिटल टोकन किंवा टठ कोड तयार होईल. हा कोड साधारण ४८ तास वैध राहणार आहे. या कालावधीत शेतकर्‍याने निवडलेल्या दुकानात जाऊन क्युआर कोड दाखवावा लागेल. विक्रेता पॉज मशीनद्वारे कोड स्कॅन केल्यानंतर बायोमेट्रिक किंवा आधार ओटीपीद्वारे अंतिम पडताळणी केली जाईल.

दुकानातील गर्दी कमी होण्याची आशा

एफएफसी प्रणालीमुळे खतासाठी दुकानांवर होणारी गर्दी आणि लांबच लांब रांगा कमी होण्यास मदत होणार आहे. दुकानात कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती आधीच मिळाल्याने शेतकर्‍यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. तसेच खत वितरणाची डिजिटल नोंद राहणार असल्याने अनुदानित खताच्या वितरणात पारदर्शकता वाढून काळाबाजाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT