सांगली : येथे मंगळवारी न्यायालयाच्या आवारात दुचाकींनी पेट घेतला. 
सांगली

Sangli News : जिल्हा न्यायालयात आग; तीन दुचाकी खाक

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; आग प्रतिबंधक यंत्रणा होती निष्क्रीय

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा न्यायालयात मंगळवारी दुपारी इलेक्ट्रीक दुचाकीला आग लागली. या घटनेत तीन दुचाकी जळून खाक झाल्या. दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा निष्क्रीय असल्याचे निदर्शनास आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर दुचाकी पार्किंग आहे. या पार्किंगमध्ये सुमारे 300 दुचाकी एकाचवेळी उभ्या असतात. मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान या पार्किंगच्या कोपऱ्यात उभी असलेली इलेक्ट्रीक दुचाकी अचानक पेटली. या आगीमध्ये पेटलेल्या दुचाकीच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या अन्य दोन दुचाकींनाही आग लागली. त्यावेळी उपस्थितांमध्ये गोंधळ सुरु झाला. प्रसंगावधान ओळखून तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक अमित कांबळे व न्यायालयाकडील वाहन चालक लक्ष्मण सावंत यांनी पेटत्या दुचाकी इतर दुचाकींपासून वेगळ्या करत दूर ढकलून दिल्या. या घटनेमध्ये दोघांना मानेवर व हातावर किरकोळ जखमा झाल्या. त्याचवेळी सुरक्षा अधिकारी जगन्नाथ खोत यांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली.

प्रसंगावधान ओळखून मुख्य सुरक्षा रक्षक नवनाथ कोळेकर, प्रसाद जाधव, विकास प्रतंगळे, शैलेश कदम, वैभव पाटील आदी सुरक्षा रक्षकांनी या इमारतीमध्ये लिप्टजवळील व वरच्या मजल्यावरील अग्निशमन यंत्रे आणून त्या चा जळत्या दुचाकींवर फवारा मारुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार 20 मिनिटे सुरु होता. दरम्यान आग अटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले. पथकाने संपूर्ण आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती कदम, जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर, जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव गि. ग कांबळे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुधीर भालेराव, उपनिरिक्षक निवास कांबळे आदींनी घटनास्थळी पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT