सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई भरतीसाठी सुपारीबाज एजंटांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा सुरू आहे. या एजंटांपासून उमेदवार, त्यांचे पालक, मित्र-परिवाराने सावध राहण्याची गरज असल्याचेही खासगीत बोलले जात आहे. उमेदवारांची दिशाभूल करून लाखो रुपये उकळले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. ‘खुला सौदा, लाखोंची बोली’, असे बोलले जात आहे.
बँकेत अनेक दिवसांपासून कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. बँक कर्मचारी संघटनेच्या सततच्या मागणीनंतर संचालक मंडळाने भरती प्रक्रिया सुरू केली. त्यात कायदेशीर आणि राजकीय अडथळे आले. ते पार केल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आली असताना पुन्हा एकदा चर्चेचे पेव फुटले आहे. एका जागेसाठी लाखो रुपयांचे दर काढल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. अनेक एजंट सक्रिय झाले आहेत. ते उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत आहेत. किती काढता येतील, याची चाचपणी सुरू आहे.
सहा महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेने नोकरभरतीचा प्रस्ताव तयार करून कंपनी निश्चित केली होती. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन भरती प्रक्रियेवर हरकती घेतल्या. त्यानंतर राज्य सरकारने ठराविक तीन कंपन्यांमार्फतच भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा अध्यादेश काढला. त्यानुसार, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने आयबीपीएस या पारदर्शक परीक्षेसाठी ख्यातनाम संस्थेमार्फत प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यालाही विरोध होऊन सहकार विभागामार्फत स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र बँकेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर स्थगिती उठवली आणि भरतीचा मार्ग मोकळा झाला.
एक चर्चा अशीही...
नेता, त्याचा पीए, नातेवाईक अशा वर्तुळाकडून पाच ते दहा लाख रुपये सध्या घेतले जात आहेत. समजा, पाच जणांकडून पाच-पाच म्हणजे २५ लाख रुपये जमा झाले. गुणवत्तेवर एखाद्या उमेदवाराची निवड झाली, तर ‘मीच केली’ म्हणून श्रेय घ्यायचे. राहिलेले २० लाख चार-सहा महिन्यांसाठी वापरायला मिळाले. जे उमेदवार आणि मंडळी खमकी असतील, त्यांना पैसे परत द्यायचे. ते देतानाही तुकडे-तुकडे करून द्यायचे. जे लेचेपेचे असतील, त्यांना दमबाजी करून ‘बुडले, अमक्या-तमक्याला द्यावे लागले’, अशी कारणे सांगायची. म्हणजेच, ‘सब माल डब्बे मे...’ या सर्व प्रकारच्या चर्चेचे काय करायचे? चर्चेचा धूर निघतोय म्हणजे आगीची शक्यता वाढलीच.
कनिष्ठ लिपिक जागा : ४४४
आलेले अर्ज : १९ हजारावर
परीक्षेची तारीख : ३१ ऑगस्ट
परीक्षा केंद्रे : सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड
जिल्ह्यात ३९ केंद्रे
प्रवेशपत्र परीक्षेच्या ८ दिवस आधी अधिकृत आयबीपीएस संकेतस्थळावर उपलब्ध
शिपाई : ७९ जागा
अर्जाची मुदत : २१ ऑगस्ट
७० गुणांची लेखी, तर ३० गुणांची मुलाखत परीक्षा
जिल्हा बँकेच्या पाच वर्षांपूर्वीच्या ४१७ जणांच्या भरतीत प्रचंड गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि मोठा गदारोळ माजला होता. या विषयावरील फौजदारी प्रलंबित आहे.
तुम्हाला फिक्स नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे.
प्रचंड बेरोजगारीमुळे काही उमेदवार आणि त्याच्याशी संबंधित मंडळी अगतिक असतात. त्यांनी जास्त सतर्क राहण्याची गरज.
बेरोजगारीच्या काळात बँकेतील ‘फिक्स पगार’ असलेली ही नोकरी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा.
काही उमेदवार व पालक सध्या संचालकांच्या, राजकीय नेत्यांच्या दारी मारताहेत फेऱ्या.
जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आयबीपीएस या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेमार्फत घेतली जात आहे. ही भरती पूर्णपणे गुणवत्तेच्या निकषावरच होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांना किंवा आमिषाला बळी पडू नये. कोणीही पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू नये.- मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक