मुंबई: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भाजपच्या नूतन संचालकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख आदी. 
सांगली

Sangli bank president election bjp strategy - जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपची मोर्चेबांधणी

sangli cooperative bank president election bjp strategy- जयंत पाटील यांचे वर्चस्व रोखण्यासाठी मुंबईतून रणनीती

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बँकेत आमदार जयंत पाटील यांच्या गटाचे संचालक संख्याबळ घटल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंचे संख्याबळ जवळजवळ समान झाल्याने, यावेळी महायुतीचा अध्यक्ष बसवण्यासाठी भाजपने राजकीय सारीपाट मांडण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नूतन संचालकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली.

मावळत्या संचालक मंडळात आमदार जयंत पाटील यांच्या गटाचे निर्विवाद बहुमत होते. त्यामुळे बँकेवर त्यांचेच पूर्ण प्रभुत्व राहिले असून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी सलग पाच वर्षे अध्यक्षपद भूषवले, तर त्यापूर्वीच्या पाच वर्षांत दिलीप पाटील अध्यक्षपदी होते. मात्र, यंदा बँकेच्या १५ जागा बिनविरोध पार पडल्या. या बिनविरोध जागांमध्ये भाजपला ४, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ३, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला १ जागा मिळाली.

उर्वरित ६ जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला. माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील हे महायुतीसोबत (भाजप) जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्षपद स्वतःकडे खेचण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे.

मुंबईत बैठक

नूतन संचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीस चंद्रकांत पाटील, सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

महेंद्र लाड यांच्या संचालकपदाबाबत आक्षेप

जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेसचे महेंद्र लाड बिनविरोध संचालक म्हणून निवडले गेले आहेत; मात्र त्यांचा १० वर्षांचा बँकेतील संचालक पदाचा कालावधी पूर्ण झाल्याने, त्याबाबत भाजपचे महादेव पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार १० वर्षांपेक्षा सलग संचालक असलेल्या उमेदवाराला पुन्हा संचालक होता येत नाही. राज्याच्या सहकार मंत्र्यांनासुद्धा या नियमानुसार राजीनामा द्यावा लागला होता. लाड यांचे संचालकपद रद्द झाल्यास महाविकास आघाडीची आणखी एक जागा कमी होणार आहे.

शेतकरीहिताचा कारभार करा : मुख्यमंत्री

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा, पारदर्शक आणि सक्षम असावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. व्यक्त बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याबरोबरच सर्वसामान्य सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी नूतन संचालकांना केले.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप समर्थक पॅनेलच्या नूतन संचालकांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक जीवनवाहिनी आहे. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक धोरणात आणि निर्णयात तळागाळातील शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी असले पाहिजे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले संचालक राहुल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख आणि अपर्णा देशमुख यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT