सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आणि बँकेच्या भविष्यातील वाटचालीची चर्चा सुरू झाली. ते बँकेचे नेतृत्व करणार, अशी अटकळ बांधली जात आहे. जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या या सत्ताकेंद्रातून राजकीय पटलावरील हालचाली होतात, हा इतिहास आहे. ते स्वतः निवडणुकीत उतरणार, हा अनेकांचा होरा मंगळवारी अर्ज सादर झाल्यानंतर खरा ठरला.
आमदार जयंत पाटील यांच्या ताब्यातील सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेत जयंत पाटील गटाचे तीन नगरसेवक होते, त्यापैकी दोघांनी त्यांची साथ सोडली. आता एक नगरसेवक त्यांचा आहे, असे मानले जाते. मागील अनुभव पाहता त्यांना बाजूला करण्यासाठी नव्या दमाच्या राजकीय नेत्यांची व्यूहरचना सुरू असल्याचे दिसते.
मागे वळून पाहताना
बँकेच्या २०२१ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे सहकार पॅनेल होते. त्याच्या विरोधात भाजप पॅनेलने लढत दिली. त्यात २१ पैकी १७ जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. १७ जागांमध्ये राष्ट्रवादी ९, काँग्रेस ७ आणि शिवसेनेला ३ जागावर समाधान मानावे लागले होते. भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. मानसिंग नाईक अध्यक्ष झाले, जयश्री पाटील उपाध्यक्ष. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी अडीच वर्षानंतर खुर्ची सोडली नाही. परिणामी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले नाही. हीच खदखद काँग्रेसमध्ये आहे.
एकतंत्री कारभार का?
आमदार जयंत पाटील यांच्याऐवजी आपणच नेतृत्व करावे असे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आदींना वाटते. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे सध्या दिसते. बँकेत एकतंत्री कारभार का? असा या मंडळींचा प्रश्न आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठका झालेल्या नाहीत, असे खासदार पाटील यांनी सांगितले, येथेच अनेक गोष्टी स्पष्ट होतात.
बँकेची 'झेडपी’ होऊ द्यायची नाही आणि सग्यासोयऱ्यांचा पटही मांडू द्यायचा नाही, असा तरूण राजकारण्यांचा यत्न दिसतो आहे. त्यासाठी आमदार कदम, खासदार पाटील यांच्यासोबत आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर यांचे सूर जुळल्याची चर्चा तरी सध्या सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतरावांचा 'अकरा प्लस'चा डाव असल्याचा आरोप केला आहे. तो लक्षात घेता जुळवाजुळव स्पष्ट होेते. दुसरीकडे पडळकर यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांना टार्गेट करून आपणच ‘अकरा प्लस’चा डाव मांडायचा, असा भाजपचा प्रयत्न असल्याचीही चर्चा रंगतेय.